पाठलाग करत महिलेच्या गळ्यावर कोयता ठेवून मंगळसूत्र हिसकावले, साताऱ्यात कोयता गँगची दहशत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 12:09 IST2025-08-29T12:09:18+5:302025-08-29T12:09:35+5:30

मॉर्निंग वॉकवेळी घडली घटना

While chasing a woman they put a sickle around her neck and snatched her mangalsutra terror of sickle gang in Satara | पाठलाग करत महिलेच्या गळ्यावर कोयता ठेवून मंगळसूत्र हिसकावले, साताऱ्यात कोयता गँगची दहशत

पाठलाग करत महिलेच्या गळ्यावर कोयता ठेवून मंगळसूत्र हिसकावले, साताऱ्यात कोयता गँगची दहशत

सातारा : सातारा शहरात ऐन गणेशोत्सवात कोयता गँग सक्रिय झाली असून, ही गँग मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलांना लक्ष्य करत आहे. आठवडाभरात अशा प्रकारच्या तीन घटना घडल्या असून गुरुवारी सकाळी प्रतापसिंह नगरातील मेडिकल काॅलेजसमोर असाच धक्कादायक प्रकार घडला.

तीन महिला माॅर्निंग वाॅक करत असताना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी पाठलाग करून एका महिलेच्या गळ्यावर कोयता ठेवून मंगळसूत्र हिसकावले. हा सारा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. त्याची क्लिप वाऱ्यासारखी व्हायरलं झाल्याने साताऱ्यातील महिला भयभीत झाल्या आहेत.

सोनाली दीपक लोंढे (वय २६, रा. कृष्णानगर, सातारा) या गुरुवारी मॉर्निंग वॉक करत प्रतापसिंह नगरातील मेडिकल काॅलेजसमोरून निघाल्या होत्या. त्यांच्यासोबत अन्य दोन महिलासुद्धा होत्या. यावेळी अचानक समोरून दुचाकीवरून तिघे युवक तोंडाला काळा रुमाल बांधून आले. दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या तरुणाने दुचाकीवरून उडी मारून लोंढे यांच्याकडे धाव घेतली. त्या तरुणाच्या हातातील कोयता पाहून त्या आरडाओरड करत पळू लागल्या. त्यांच्यासोबत असलेल्या इतर दोन महिला पळून गेल्या.

तो तरुण लोंढे यांच्या मागे धावत आला. अचानक खड्ड्यात पाय पडल्याने त्या खाली पडल्या. अशा अवस्थेत त्या चोरट्याने त्यांच्या गळ्यावर कोयता ठेवून दीड तोळ्यांचे मंगळसूत्र हिसकावले. यानंतर तिघे चोरटे तेथून पसार झाले. सातारा शहर पोलिस ठाण्यात तिघांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

‘त्यांनी’ गेटवरून मारल्या उड्या

कोयता घेऊन चोरट्यांनी दहशत माजविल्याने त्या तिन्ही महिला प्रचंड घाबरल्या. जीव वाचविण्यासाठी त्यांनी एका बंगल्यामध्ये गेटवरून उड्या मारून आत प्रवेश केला. त्यानंतर घडलेला प्रकार त्या रहिवाशांना सांगितला.

व्हायरलं दृश्य अंगावर काटा आणणारे

सीसीटीव्हीतील लुटमारीचे दृश्य पाहून अक्षरश: अंगावर काटा येतो. अत्यंत निदर्यीपणे महिलेवर कोयता उगारून पाठलाग करून मंगळसूत्र लुटून नेले. हा प्रकार सीसीटीव्हीद्वारे साऱ्या साताऱ्यात व्हायरलं झाला. यामुळे माॅर्निंग करणाऱ्या केवळ महिलाच नव्हे तर पुरुषांमध्येही घबराटीचे वातावरण आहे.

कोयता गँगने उडवली पोलिसांची झोप..

ऐन गणेशोत्सवात कोयता गँगने पोलिसांची अक्षरश: झोप उडवली आहे. या गँगला पकडण्यासाठी सातारा शहर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखा, शाहूपुरी, सातारा तालुका शिवाय वाहतूक शाखेतील काही अधिकारी पोलिस कर्मचारीही गुंतले आहेत. मोठा फाैजफाटा प्रतापसिंह नगरमध्ये तपासामध्ये सक्रिय झाला आहे.

Web Title: While chasing a woman they put a sickle around her neck and snatched her mangalsutra terror of sickle gang in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.