Maratha Reservation: ‘राजे बोलले म्हणजे विषय संपला’, मनोज जरांगे यांनी दाखविला शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 15:46 IST2025-09-03T15:45:39+5:302025-09-03T15:46:43+5:30
सातारा गॅझेटीयरची स्वीकारली जबाबदारी

Maratha Reservation: ‘राजे बोलले म्हणजे विषय संपला’, मनोज जरांगे यांनी दाखविला शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर विश्वास
सातारा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेले मनोज जरांगे-पाटील यांचे उपोषण मंगळवारी मागे घेण्यात आले. सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा गॅझेटीयरची जबाबदारी स्वीकारल्याने जरांगे-पाटील यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला. ‘राजे बोलले म्हणजे विषय संपला’ असेही ते म्हणाले.
जरांगे-पाटील यांनी २९ ऑगस्टपासून मुंबईत आंदोलन सुरू केले होते. मराठा आरक्षणावर ठोस निर्णय होत नसल्याने आंदोलनाचा दबाव वाढत होता. अखेर मंगळवारी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्या शिष्टमंडळाने जरांगे-पाटील यांची भेट घेतली. या भेटीत मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती देण्यात आली.
जरांगे यांनी तातडीने जीआर काढण्याची मागणी केली, जी सरकारने मान्य केली. त्याचप्रमाणे, जरांगे-पाटील यांनी सातारा, औंध आणि हैदराबाद गॅझेटीयरची अंमलबजावणी करण्याची मागणीही केली. यावर बोलताना राधाकृष्ण विखे-पाटील यांनी औंध आणि सातारा गॅझेटीयरमध्ये काही कायदेशीर त्रुटी आहेत, ज्याची जबाबदारी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतली असल्याचे सांगितले. यावर जरांगे-पाटील यांनी तत्काळ प्रतिक्रिया देत, ‘राजे बोलले म्हणजे विषय संपला,’ असं म्हणत शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर पूर्ण विश्वास दाखवला.
सातारा राज्याच्या केंद्रस्थानी..
शिवेंद्रसिंहराजे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे, मात्र ते कायद्यात आणि घटनेत टिकायला हवे. जरांगे-पाटील यांच्या मुद्द्याला आमचा पाठिंबा आहे, अशी भूमिका यापूर्वीच स्पष्ट केली होती. आता जरांगे-पाटील यांनी शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर दाखवलेल्या या विश्वासामुळे सातारा पुन्हा एकदा राज्याच्या केंद्रस्थानी आला आहे.