सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला देशात नंबर वन बनवायचंय - तुषार चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 16:26 IST2026-01-06T16:26:00+5:302026-01-06T16:26:33+5:30
‘तारा’ अन् ‘चंदा’ वाघिणींची मोहीम यशस्वी करण्यात सर्वांचा मोलाचा वाटा

संग्रहित छाया
कराड : ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात काम करताना अनेक अनुभव आले. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पास नंबर वन बनवायचं असून, ‘ऑपरेशन चंदा’ व ‘तारा’ वाघिणींची मोहीम यशस्वीपणे पार पाडण्यात सर्वांचा मोलाचा वाटा आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला चांगल्या प्रकारे बनवायचं असून, त्यासाठी प्रकल्पातील प्रत्येकजण परिश्रम घेत असल्याची माहिती सह्याद्री व्याघ्र राखीव प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांनी केले.
कराड येथे सह्याद्री व्याघ्र राखीवच्या १६ व्या वर्धापनदिन कार्यक्रमात सह्याद्री व्याघ्रमधील कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तुषार चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास कोयना वन्यजीव विभाग सह्याद्री व्याघ्र राखीवचे उपसंचालक किरण जगताप, चांदोली वन्यजीव विभाग सह्याद्री व्याघ्र राखीवच्या उपसंचालक स्नेहलता पाटील, सह्याद्री व्याघ्र राखीवचे विभागीय वन अधिकारी श्रीकांत पवार, कुंडल विकास प्रशासन व व्यवस्थापनचे स्थानिक भागवत, सह्याद्री वाइल्ड लाइफ संस्थेचे आशिष पिलाणी, कृष्णा हॉस्पिटलच्या डॉ. अर्चना कोलागेकर, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. केंगार, सह्याद्री व्याघ्र राखीवचे मानद वन्य जीव रक्षक रोहन भाटे, पर्यावरणप्रेमी नाना खामकर, पक्षी अभ्यासक डॉ. सुधीर कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती.
रोहन भाटे म्हणाले, २००६ व २००७ साली सह्याद्रीत वाघ होते. आताही वाघीण आल्या आहेत, ही चांगली गोष्ट आहे. आता वाघांमुळे वन पर्यटन उदयास येणार आहे व त्यामुळे मोठी स्थानिक रोजगार निर्मिती होणार आहे.
नाना खामकर म्हणाले, गेली ३० वर्षे सह्याद्री फिरत आहे. चंदा वाघिणीची क्लिप पाहिल्यावर २०१० सालची आठवण आली. त्यावेळी आम्ही बॉक्साइटच्या खाणीतून होणारी ट्रक वाहतूक बंद करायला भाग पाडले. त्यानंतर २००१ मध्ये सह्याद्री व्याघ्र राखीवची मागणी केली. मागणीनंतर सहा वर्षांनी २०१० मध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्प घोषित झाला. आता वन विभाग या प्रकल्पात अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहे, याचा आनंद होत आहे.