कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 20:16 IST2025-06-20T20:15:25+5:302025-06-20T20:16:37+5:30

पावसाचा जोर कायम : नवजाला ९८, महाबळेश्वरला ९४ मिलिमीटरची नोंद 

Water storage in Koyana increased by 4.5 TMC; Release from dam begins | कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 

कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर असून, २४ तासांत नवजा येथे सर्वाधिक ९८ तर महाबळेश्वरला ९४ मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयना धरण पाणीसाठ्यात २४ तासांत जवळपास साडेचार टीएमसीने वाढ झाली आहे. त्यामुळे धरणातील साठा ३२ टीएमसीवर पोहोचलाय. तर पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी पायथा वीजगृहातून १ हजार ५० क्युसेक विसर्ग सुरू झाला आहे.


सातारा शहरासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस पडत आहे. पश्चिमेकडील तापोळा, महाबळेश्वर भागात पावसाने नुकसान वाढू लागले आहे. काही ठिकाणी रस्ते वाहून गेलेत, तर कोठे रस्त्यावर मातीचा भराव वाहून आला आहे. यामुळे प्रशासनाकडून उपाययोजना सुरू आहेत. त्यातच पश्चिम भागात कास, बामणोली, कांदाटी खोरे, नवजा, कोयनानगर भागात संततधार पाऊस आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची वेळ आली आहे.

शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ८७ मिलिमीटर तर नवजा ९८ मिलिमीटर आणि महाबळेश्वरला ९४ मिलिमीटर पर्जन्यमान झाले आहे. कोयना धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे सकाळच्या सुमारास धरणात ५१ हजार क्युसेक वेगाने पाणी येत होते. धरणातील पाणीसाठा ३२.५१ टीएमसी झाला आहे. ३०.८९ टक्के धरणे भरले होते. पण, धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी शुक्रवारी सकाळी ९ वाजता पायथा वीजगृहातील एक युनिट सुरू करण्यात आले आहे. त्यामधून १ हजार ५० क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरू झाला आहे. त्यामुळे यावर्षी पावसाळ्यात प्रथमच कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. तसेच नदीकाठच्या रहिवाशांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: Water storage in Koyana increased by 4.5 TMC; Release from dam begins