Satara: कोयना अन् कृष्णाकाठच्या कराड तालुक्यावर पाणीटंचाईचे ‘सावट’; टँकरसाठी १३.१४ लाखांची तरतूद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 17:24 IST2026-03-14T17:23:28+5:302026-03-14T17:24:26+5:30

५४.९८ लाखांचा कृती आराखडा तयार : १९ गावांत पाणीटंचाईची शक्यता

Water shortage severe in Karad taluka on the banks of Koyna and Krishna | Satara: कोयना अन् कृष्णाकाठच्या कराड तालुक्यावर पाणीटंचाईचे ‘सावट’; टँकरसाठी १३.१४ लाखांची तरतूद

संग्रहित छाया

संतोष गुरव

कराड : यंदा फेब्रुवारी महिन्यात उन्हाची तीव्रता वाढली असल्याने अंगाची लाहीलाही होऊ लागली आहे. मार्च महिन्याला सुरुवात झाली असून, आत्तापासूनच कोयना-कृष्णाकाठच्या कराड तालुक्यातील काही गावांत पाण्याची कमतरता भासू लागली आहे. यंदाचा उन्हाळ्याच्या झळा पाहता यंदा देखील कराड तालुक्यात तीव्र पाणीटंचाईचे सावट निर्माण होणार असल्याचे दिसून येत आहे. कारण त्या अनुषंगाने प्रशासनाने ५४.९८ लाखांचा कृती आराखडा तयार केला असून, तालुक्यात प्रामुख्याने मसूरचा पूर्व भाग आणि दक्षिणेकडील डोंगरी गावांमध्ये टंचाईची तीव्रता आत्तापासूनच अधिक जाणवू लागली आहे.

टँकरने पाणीपुरवठ्यासाठी १३.१४ लाखांची तरतूद

कराड पंचायत समितीअंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला असून, मार्च ते जून या कालावधीसाठी टप्प्याटप्प्याने उपाययोजना निश्चित केल्या आहेत. ५४.९८ लाखांचा कृती आराखडा तयार करण्यात आला असून, संभाव्य टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी १३.१४ लाखांची तरतूद करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

वाचा: येरळा नदीवरील बंधाऱ्याला गळती; निकृष्ट वक्र दरवाजामुळे पाणीसाठा वाया, पिके अडचणीत

५४ लाख ९८ हजारांचा निधी प्रस्तावित...

प्रामुख्याने मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांत पाणीटंचाईचा सामना करावा लागणाऱ्या कराड तालुक्यातील गावांसाठी प्राथमिक टप्प्यातील उपाय सुचवण्यात आले आहेत. जानेवारी ते मार्चदरम्यान १४ गावांत नवीन विंधन विहिरी घेण्याचा प्रस्ताव आहे. तसेच ९ गावे आणि ५ वाड्यांमध्ये नळपाणीपुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती प्रस्तावित करण्यात आली आहे. याशिवाय १३ गावे व एका वाडीमध्ये विहिरींचे खोलीकरण व गाळ काढणे ही कामे केली जाणार आहेत. या सर्व कामांसाठी एकूण ५४ लाख ९८ हजार रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.

१९ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाईची शक्यता...

प्रशासनाकडून तयार करण्यात आलेल्या आराखड्यानुसार १८ गावे व एका वाडीत खासगी विहिरींचे अधिग्रहण करावे लागणार आहे. या १९ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता आहे. काही गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागणार असून, एप्रिल व मे महिन्यांत ५ गावे व २ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे. यासाठी १३ लाख १४ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.

अपुऱ्या पावसामुळे पाणीटंचाईचे संकट

हरबरवाडी, धनगरवाडी योजनेचे पाणी जरी सोडले तरी ते शेती व पिण्यासाठी पुरेसे ठरणार नाही. गायकवाडवाडी येथे हणबरवाडी, धनगरवाडी योजनेची पाईपलाईन झाली आहे. मात्र, ती लहान असल्यामुळे गायकवाडवाडी तलावात पाणी पोहोचत नाही. पाणीपुरवठ्याच्या विहिरी तलावाला लागून आहेत. तलावात पाणीसाठा झाला तर विहिरींना पर्क्युलेशनने पाणी येईल, पर्यायाने गावांना उन्हाळ्यात पाणी उपलब्ध होईल. या दिवसात भूजल पातळीतील पाण्याची घट आणि अपुऱ्या पावसामुळे या गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो.

अशी आहे कराड तालुक्यातील स्थिती

  • १४ गावांत नवीन विहिरी व भिंती बांधकाम
  • ९ गावे व ५ वाड्यांत नळयोजनांची दुरुस्ती
  • १३ गावे व एका वाडीत विहिरींचे खोलीकरण व गाळ काढणे
  • एकूण ५४.९८ लाखांचा प्राथमिक आराखडा
  • १९ गावांत तीव्र टंचाईची शक्यता (एप्रिल-जून)
  • टँकरसाठी १३.१४ लाखांची तरतूद

Web Title : सतारा: कराड में पानी की कमी; टैंकरों के लिए ₹13.14 लाख आवंटित।

Web Summary : बढ़ती गर्मी और अपर्याप्त वर्षा के कारण कराड में पानी की कमी है। प्रशासन ने ₹54.98 लाख की योजना तैयार की है, जिसमें मसूर और दक्षिणी पहाड़ी क्षेत्रों के 19 गांवों में टैंकरों से पानी की आपूर्ति के लिए ₹13.14 लाख शामिल हैं। कुओं को गहरा किया जाएगा और पाइपलाइनों की मरम्मत की जाएगी।

Web Title : Satara: Water scarcity looms over Karad; ₹13.14 lakh allocated for tankers.

Web Summary : Karad faces water scarcity due to rising heat and insufficient rainfall. The administration has prepared a ₹54.98 lakh plan, including ₹13.14 lakh for tanker water supply to 19 villages, especially in Masur and southern hilly areas. Wells will be deepened, and pipelines repaired.