Satara: कोयना धरणाचे दरवाजे उघडणार!, नदीकाठी सतर्कतेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 19:23 IST2025-07-14T19:21:40+5:302025-07-14T19:23:58+5:30
सहा वक्र दरवाजे दीड फुटाने उचलण्यात येणार

Satara: कोयना धरणाचे दरवाजे उघडणार!, नदीकाठी सतर्कतेचा इशारा
सातारा : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढत चालला आहे. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी मंगळवारी सकाळच्या सुमारास या पावसाळ्यात प्रथमच धरणाच्या दरवाजातून विसर्ग करण्यात येणार आहे. तसेच नदीपात्रात आणखी सुमारे ५ हजार क्यूसेक विसर्ग होणार आहे. यामुळे कोयना नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
पाटण तालुक्यातील कोयना धरणाची एकूण पाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. यावर्षी वेळेत आणि दमदार पाऊस झाला. मागील एक महिन्यापासून कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत आहे. पण, मागील आठवड्यात पावसाचे प्रमाण कमी झालेले. मात्र, रविवारपासून पुन्हा पाऊस वाढला आहे. त्यामुळे धरणात पाणी आवक वाढली आहे. तसेच धरणातील पाणीसाठा ७५ टीएमसीजवळ पोहोचलाय.
मान्सूनचा कालावधी विचारात घेता अजून अडीच महिने पाऊस राहणार आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी मंगळवार, दि. १५ जुलै रोजी सकाळच्या सुमारास धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फुटाने उचलण्यात येणार आहेत. त्यातून सुमारे ५ हजार क्यूसेक विसर्ग होऊ शकतो. तर सध्या पायथा वीजगृहातून २ हजार १०० क्यूसेक विसर्ग सुरू आहे. त्यामुळे एकूण ७ हजार १०० क्यूसेक विसर्ग होणार असल्याने कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.