Satara: कृष्णा-वेण्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ, शाहू महाराज यांची समाधी गेली पाण्याखाली
By सचिन काकडे | Updated: May 23, 2025 19:39 IST2025-05-23T19:38:50+5:302025-05-23T19:39:23+5:30
सचिन काकडे सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून, संगम माहुली येथील कृष्णा-वेण्णा या नद्यांच्या पाणीपातळीत शुक्रवारी ...

Satara: कृष्णा-वेण्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ, शाहू महाराज यांची समाधी गेली पाण्याखाली
सचिन काकडे
सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून, संगम माहुली येथील कृष्णा-वेण्णा या नद्यांच्या पाणीपातळीत शुक्रवारी लक्षणीय वाढ झाली. या पाण्यामुळे नदीपात्रात असलेली छत्रपती शाहू महाराज यांची समाधी निम्मी पाण्याखाली गेली असून, काशीविश्वेश्वर मंदिराच्या पायऱ्यांनाही पाणी टेकले आहे.
सातारा जिल्ह्यात दरवर्षी १५ जूननंतर मान्सून सक्रिय होतो. पावसाचा जोर हळूहळू वाढत गेल्यानंतर धोम व कण्हेर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जातो. यानंतर संगम माहुली येथे असलेल्या कृष्णा व वेण्णा या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊन माहुलीचा घाट पाण्याखाली जातो. साधारण जुलै, ऑगस्टमध्ये अशी परिस्थिती निर्माण होते; परंतु यंदा मे महिन्यातच वळीव पावसाने दमदार हजेरी लावल्याने नद्यांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली. तसेच सातारा शहराचे संस्थापक छत्रपती शाहू महाराज यांची समाधीदेखील निम्मी पाण्याखाली गेली.
नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असली तरीदेखील कैलास स्मशानभूमी येथील सर्व अग्निकुंड सुस्थितीत आहेत. दरम्यान, मे महिन्यातच प्रथमच संगम माहुली घाट जलमय झाल्याने पाणी पाहण्यासाठी घाटावर नागरिकांची तुफान गर्दी झाली होती.
जून, जुलैनंतर संगम माहुलीचा घाट पाण्याखाली जातो हा आजवरचा इतिहास; परंतु मे महिन्यातच वळीव पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नद्यांना पूर आल्यासारखी स्थिती आहे. छत्रपती शाहू महाराज यांची निम्मी समाधी पाण्याखाली गेली असून, गेल्या तीस-चाळीस वर्षांत असे चित्र प्रथमच पाहायला मिळाले. - प्रकाश माने, ग्रामपंचायत सदस्य, संगम माहुली