कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयातील पाणीपातळी घटली, वासोटा ट्रेकर्सची होऊ लागली दमछाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 16:21 IST2022-04-26T16:20:35+5:302022-04-26T16:21:06+5:30
उन्हाळ्याच्या तीव्र झळा व विजेची, सिंचनाची वाढती मागणी यामुळे कोयना धरणातील पाणी कमी झाले आहे.

कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयातील पाणीपातळी घटली, वासोटा ट्रेकर्सची होऊ लागली दमछाक
पेट्री : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाची पाणीपातळी घटली आहे. वासोटा किल्ल्याच्या ट्रेकिंगला जाताना नदीपात्रातील अतिरिक्त अंतर वाढल्याने ट्रेकर्सची दमछाक होत आहे. कोयना धरणाच्या बॅकवाॅटरने तयार झालेला शिवसागर जलाशय नेहमीच पर्यटक व निसर्गप्रेमींना भुरळ घालत असतो.
सह्याद्रीच्या डोंगररांगेतील कोयना अभयारण्याचे घनदाट जंगल व त्यात शिवसागराचे निळेशार पाणी यामुळे हा परिसर ॲमेझाॅनच्या जंगलाची प्रतिकृती भासतो. तापोळा, बामणोली, मुनावळे येथील बोटिंगचा थरार, ऐतिहासिक वासोटा, महिमंडनगड किल्ले तर दुर्गम कांदाटी खोऱ्यातील चकदेव, पर्वत, उतेश्वर, नागेश्वर ही स्वयंभू शिवलिंग आहेत. यामुळे पर्यटनासाठी हा परिसर समृद्ध आहे.
उन्हाळ्याच्या तीव्र झळा व विजेची, सिंचनाची वाढती मागणी यामुळे कोयना धरणातील पाणी कमी झाले आहे. वासोटा किल्ला ट्रेकिंगसाठी अजूनही ट्रेकर्स येत आहेत. परंतु पाणीपातळी कमी झाल्याने नदीपात्रातील दोन किलोमीटरचे अतिरिक्त अंतर चालावे लागत आहे. त्यात उन्हाची तीव्रता यामुळे चालणाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे. पाणी पातळी घटल्याने बोटिंग व्यवसायावरही परिणाम होणार आहे.