एक किलोमीटरसाठी दोन तास प्रतीक्षा कऱ्हाडात

By Admin | Updated: July 13, 2014 22:52 IST2014-07-13T22:48:59+5:302014-07-13T22:52:39+5:30

वाहतुकीची कोंडी : रस्त्यानजीकच्या विवाह सोहळ्याचा परिणाम

Waiting for one kilometer for two hours | एक किलोमीटरसाठी दोन तास प्रतीक्षा कऱ्हाडात

एक किलोमीटरसाठी दोन तास प्रतीक्षा कऱ्हाडात

कऱ्हाड : येथील कॅनॉल नजीकच्या मंगल कार्यालयात असणारा विवाहसोहळा रविवारी वाहनधारकांना चांगलाच महागात पडला. नवरदेव देवदर्शनासाठी बँड व वऱ्हाडी मंडळींसह मार्गस्थ होत असताना या परिसरात वाहतुकीची कोंडी झाली. दहा-पंधरा मिनिटांत नवरदेव पुन्हा मंगल कार्यालयात परतले; पण वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिसांना तब्बल दोन तास घाम गाळावा लागला. शहरातील कृष्णा नाक्यापासून कृष्णा कॅनॉलपर्यंतच्या मार्गावर वारंवार वाहतुकीची कोंडी होते. यापूर्वी अरुंद पुलामुळे दिवसातून किमान तीन-चार वेळा वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता; पण सध्या जुन्या पुलानजीकच दुसरा उंच पूल बांधण्यात आल्यामुळे वाहतूक एकेरी होऊन कोंडी फुटण्यास मदत झाली आहे. राज्यमार्ग असल्याने या मार्गावर नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ असते. कऱ्हाडहून विटा, शामगाकडे जाणारी वाहने कॅनॉलवरून पूर्वेच्या दिशेला वळण घेतात तर विद्यानगर, मसूरकडे जाणारी वाहने पश्चिमेला वळतात. त्याचप्रमाणे विद्यानगरकडून कऱ्हाडला येणारी वाहने कॅनॉलपासून काटकोनात नवीन पुलाकडे वळतात तर विटा, शामगावकडून येणारी वाहनेही नवीन पुलाकडेच मार्गस्थ होतात. या चौकात सिग्नल यंत्रणा नाही. तसेच कधी-कधी वाहतूक पोलीसही याठिकाणी नेमण्यात येत नाही. त्यामुळे एकाचवेळी उलटसुलट दिशेने वाहने आल्यास वाहतुकीची मोठी कोंडी होते. रविवारी तर या कोंडीत आणखीनच भर पडली. कॅनॉल नजीकच्या मंगल कार्यालयात दुपारी एक विवाहसोहळा होता. विवाहापूर्वी नवरदेव देवदर्शनासाठी निघाले. त्यावेळी चारही बाजूंने येणारी वाहने ठप्प झाली. काही वेळात नवरदेव व वऱ्हाडी पुन्हा कार्यालयात पोहोचले; पण उलटसुलट वाहने आल्याने येथे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर वाहतूक पोलीस त्याठिकाणी पोहोचले खरे; पण तोपर्यंत चारही बाजूला वाहनांच्या मोठ-मोठ्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक पोलिसांनी कोंडी फोडण्यास सुरुवात केल्यानंतर वाहने हळूहळू मार्गस्थ झाली. मात्र, वाहतूक पूर्ववत होण्यास दीड ते दोन तासांचा कालावधी लागला. (प्रतिनिधी)

Web Title: Waiting for one kilometer for two hours