Local Body Election: सातारा जिल्ह्यात ३७२ केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार, प्रशासकीय यंत्रणा सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 19:28 IST2025-12-01T19:27:38+5:302025-12-01T19:28:08+5:30
मतदान केंद्र व परिसरात मोबाइल वापरात अथवा व्हिडीओ काढण्यास निर्बंध

Local Body Election: सातारा जिल्ह्यात ३७२ केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार, प्रशासकीय यंत्रणा सज्ज
सातारा : सातारा जिल्ह्यातील फलटण आणि महाबळेश्वर वगळता उर्वरित सात नगरपालिका आणि मेढा नगरपंचायतीसाठी मंगळवारी (दि. २ डिसेंबर) ३७२ केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या महत्त्वपूर्ण प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन आणि निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे.
निवडणूक जाहीर झाल्यापासून जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. अर्ज दाखल करण्यापासून ते चिन्ह वाटपापर्यंत अनेक राजकीय घडामोडी घडल्या. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी या युतीतील प्रमुख पक्षांनी निवडणुकीत स्वतंत्रपणे उभे राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे चुरस वाढली असून, महाविकास आघाडी आणि अपक्ष उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणात आव्हान उभे केले आहे.
पालिकेवर आपल्याच पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी आणि आपल्या विचारांची सत्ता आणण्यासाठी राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली. प्रचार यंत्रणा प्रभावीपणे राबवण्यात आली. आपली ‘वोट बँक’ मजबूत करण्यासाठी राज्यातील बड्या नेत्यांच्या सभादेखील साताऱ्यात घेण्यात आल्या. या सर्व राजकीय घडामोडींना सोमवारी रात्री १० वाजता पूर्णविराम मिळणार असून, मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडेल.
प्रशासकीय तयारी पूर्ण
- मतदान प्रक्रिया शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा सज्ज
- सात नगरपालिका आणि एका नगरपंचायतीसाठी एकूण ३७२ मतदान केंद्रे
- प्रत्येक केंद्रावर पुरेसा पोलिस बंदोबस्त, मतदान अधिकारी आणि आवश्यक सामग्रीची व्यवस्था
- मतदान केंद्र व परिसरात मोबाइल वापरात अथवा व्हिडीओ काढण्यास निर्बंध
या ठिकाणी मतदान
नगरपालिका : सातारा, कराड, मलकापूर, रहिमतपूर, म्हसवड, वाई, आणि पाचगणी
नगरपंचायत : मेढा
३ लाख २८ हजार मतदार...
सात पालिका व एका नगरपंचायतीसाठी एकूण ३ लाख २८ हजार २३७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यापैकी पुरुषांची संख्या १ लाख ६३ हजार २६८ आहे, तर महिला मतदारांची संख्या १ लाख ६४ हजार ९६९ इतकी आहे. या पालिकांसाठी एकूण १०९ प्रभाग असून, महाबळेश्वर २०, फलटण २७, कराड १ व मलकापूर २ असे ५० उमेदवार वगळता ऊर्वरित २०० उमेदवारांसाठी मतदान होणार आहे. मतदान प्रकियेसाठी ३७२ मतदान केंद्र असणार आहेत.