विश्वास पाटील यांनी संमेलनाचे अध्यक्षपद सोडावे - भारत पाटणकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 14:05 IST2025-09-25T14:04:16+5:302025-09-25T14:05:48+5:30
जातीयवादी लोकांत सामील झाल्याने त्यांची अवनती

विश्वास पाटील यांनी संमेलनाचे अध्यक्षपद सोडावे - भारत पाटणकर
सातारा : लेखक विश्वास पाटील यांची पुस्तके शुद्र-अतिशुद्रांच्या जीवनावर आहेत. अशा लेखकाने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारावे, ही त्यांची अवनती आहे. ते राजमान्य राजश्री विश्वासराव पाटील झाले आहेत. जातीयवादी लोकांत सामील होऊन त्यांनी एकप्रकारे आत्महत्याच केली आहे. त्यांनी अध्यक्षपद सोडावे, अन्यथा सर्व शोषित जाती-जमाती त्यांच्या सातारा प्रवेशाला विरोध करतील, असा इशारा डाॅ. भारत पाटणकर यांनी दिला आहे.
सातारा येथील ‘सुटा’च्या कार्यालयात विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्रच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत डाॅ. पाटणकर बोलत होते. डाॅ. पाटणकर म्हणाले, सातारा हा महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा मूळ जिल्हा आहे. भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य आणि शिक्षणही येथेच झाले आहे. येथेच आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. हे संमेलन बिघडलेल्यांचे आहे. अशा संमेलनाचे अध्यक्षपद विश्वास पाटील यांनी स्वीकारावे ही त्यांची अवनती आहे. ते पूर्ण धर्मांध व जातीयवाद्यांत सहभागी झाले आहेत. लोकांनीही अशा संमेलनाला जाऊ नये.
वाचा- संमेलनाध्यक्ष खोटे बोलतात, विश्वास पाटील यांच्या भावाचाच गंभीर आरोप
अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांनी आपल्या विधानाबद्दल बहुजन जाती-जमातीची, सातारा गॅझेटमध्ये जे १०० टक्के कुणबी आहेत; पण त्यांना मराठा म्हणून आरक्षण नाकारले जाते, त्या कुणबी समाजाची माफी मागावी व अध्यक्षपद सोडावे. असे झाले नाही, तर सर्व जनता, शोषित जाती विरोध करतील. प्रतिसरकारचा हा जिल्हा आहे, हेही लक्षात ठेवावे, असा इशाराही डाॅ. पाटणकर यांनी दिला.
नवीन लिखाण नसल्याने उत्सवमूर्ती..
चुकीच्या छावणीत आणि विचारात प्रवेश न करण्याचा पर्याय निवडावा असे वाटते, असा सल्लाही डॉ. पाटणकर यांनी विश्वास पाटील यांना दिला. त्याचबरोबर नवीन काही त्यांच्याकडून लिखाण नाही. त्यामुळे त्यांनी उत्सवमूर्ती होण्याचे ठरविले असावे. त्यातूनच अध्यक्षपद स्वीकारले, असा टोलाही लगावला.