भैरेवाडी खूनप्रकरणी ग्रामस्थांचा मल्हारपेठ पोलिस ठाण्यावर मार्चो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 16:57 IST2022-12-12T16:57:24+5:302022-12-12T16:57:48+5:30
देसाई याच्या मारेकऱ्याला पोलिसांनी १२ तासाच्या आतच बेड्या ठोकल्या

भैरेवाडी खूनप्रकरणी ग्रामस्थांचा मल्हारपेठ पोलिस ठाण्यावर मार्चो
हणमंत यादव
चाफळ : पाटण तालुक्याच्या चाफळ विभागातील भैरेवाडी (डेरवण) येथील खून प्रकरणाला वेगळे वळण लागू पाहत आहे. यातील मुख्य आरोपी नारायण मोंडे सोबत आणखी मारेकरी असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक केला आहे. घटनेच्या तिसऱ्या दिवशी संतप्त ग्रामस्थांनी मल्हारपेठ पोलिस ठाण्यावर धडक मोर्चा काढत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी निवेदनाव्दारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, भैरेवाडी येथील वडाप व्यावसाईकाचा सिताराम बबन देसाई (वय ४५) शुक्रवारी (दि ९) मध्यरात्री अनैतिक संबंधातून दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. खूनानंतर संशयिताने पलायन केले होते. घटनेच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांनी सिताफिने सापळा रचून आरोपी नारायण तुकाराम मोंडे (४८) यास गणेवाडी गावच्या जंगलातून अटक केली होती. यावेळी नारायण मोंडे याने चौकशी दरम्यान पत्नी सोबत मयत सिताराम देसाई याचे अनैतिक संबंध असल्याने त्याचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली. या घटनेनंतर गावात भितीचे वातावरण पसरले आहे. कारण या खुनात आरोपी मोंडे याच्या सोबत आणखी काही लोकांचा सहभाग असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
सिताराम देसाई याच्या मारेकऱ्याचा पोलिसांनी १२ तासाच्या आतच शोध लावत बेड्या ठोकल्या. त्यामुळे पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. असे असतानाच भैरेवाडीतील संतप्त ग्रामस्थांनी या प्रकरणात आणखी काही मारेकरी सामील असल्याचा संशय व्यक केला आहे. त्यामुळे देसाई यांच्या कुटुंबियांना धोका असल्याने मोकाट गुन्हेगारांचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यावेळी गावातील ग्रामस्थ, महिलांची मोठी उपस्थिती होती.
भैरेवाडी खुन खटल्यातील आरोपी नारायण मोंडे याची चौकशी सुरु आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनातील माहिती ग्रहित धरुन तपास सुरु आहे. या प्रकरणात जर कोणी सहभागी असतील तर नक्कीच त्यांच्यावरही कारवाई होईल. - उत्तम भापकर - सहाय्यक पोलिस निरीक्षक मल्हारपेठ