US-Israel-Iran war: परदेशवारी लांबणीवर; सातारकरांचा दुबई, बाली, व्हिएतनामला ‘टाटा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 12:51 IST2026-03-03T12:50:58+5:302026-03-03T12:51:36+5:30

आंतरराष्ट्रीय टूर तूर्त रद्द 

US-Israel-Iran war All international tours from Satara district to Dubai, Bali, Vietnam have been cancelled for now | US-Israel-Iran war: परदेशवारी लांबणीवर; सातारकरांचा दुबई, बाली, व्हिएतनामला ‘टाटा’

संग्रहित छाया

सातारा : अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर होत असलेल्या हल्ल्यांमुळे सध्या आखाती देशांसह जगभरात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या युद्धाचे पडसाद आता थेट सातारकर पर्यटकांच्या नियोजनावर उमटू लागले आहेत. सुरक्षिततेचा उपाय म्हणून सातारा जिल्ह्यातून दुबई, बाली, व्हिएतनाम, श्रीलंका, कंबोडिया, भूतान, नेपाळ यांसारख्या प्रमुख देशांकडे जाणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय टूर तूर्तास रद्द करण्यात आल्या आहेत. युद्धजन्य परिस्थिती निवळल्यानंतरच परदेशवारीचे नियोजन करण्याचा निर्णय पर्यटकांनी घेतला आहे.

सातारा जिल्हा निसर्गसमृद्ध असला तरी, गेल्या काही वर्षांत जिल्ह्यातून विदेशवारी करणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. केवळ पर्यटनासाठीच नव्हे, तर शिक्षण, नोकरी आणि व्यवसायानिमित्त सातारकर मोठ्या प्रमाणावर परदेशात स्थायिक आहेत. प्रामुख्याने दुबई, व्हिएतनाम, मलेशिया, बँकॉक, श्रीलंका, नेपाळ आणि भूतान ही सातारकरांची सर्वाधिक पसंतीची पर्यटनस्थळे आहेत. अनेकांनी उन्हाळी सुट्यांच्या पार्श्वभूमीवर आपली दुबई आणि आखाती देशांची वारी आगाऊ आरक्षित केली होती. यासाठी नामांकित ट्रॅव्हल्स कंपन्यांनीही जय्यत तयारी केली होती. मात्र, अमेरिका, इराण आणि दुबई परिसरातील वाढत्या तणावामुळे पर्यटन क्षेत्राला मोठा आर्थिक फटका बसला आहे.

सातारा जिल्ह्यात सुमारे ३८ अधिकृत ट्रॅव्हल्स कंपन्या कार्यरत आहेत. सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून यातील बहुतांश कंपन्यांनी आपल्या नियोजित आंतरराष्ट्रीय सहली स्थगित केल्या आहेत. जोपर्यंत युद्ध थांबून परिस्थिती पूर्णपणे पूर्वपदावर येत नाही, तोपर्यंत या सहली सुरू होणार नाहीत, अशी माहिती ट्रॅव्हल्स चालकांकडून देण्यात आली.

काश्मीरमधील तणावानंतरही देशांतर्गत पर्यटनाकडे नागरिकांनी काही काळ पाठ फिरवली होती. सुमारे आठ-दहा महिन्यांनंतर तेथील परिस्थिती सुरळीत झाली. आता जागतिक पातळीवर युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्याने सर्व मोठ्या देशांची पर्यटन सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. प्रवाशांची सुरक्षितता आमच्यासाठी सर्वोच्च आहे. परिस्थिती शांत झाल्यानंतरच पुन्हा पर्यटनाचे चक्र गतिमान होईल. - गिरीश साठे, टूर चालक, सातारा

Web Title : अमेरिका-ईरान तनाव से सातारा की विदेश यात्रा योजनाएं स्थगित; पर्यटन रुका।

Web Summary : अमेरिका-ईरान तनाव के कारण सातारा के निवासियों ने विदेश यात्रा योजनाएं स्थगित कर दी हैं। दुबई, वियतनाम के पर्यटन रद्द। स्थिति सामान्य होने तक यात्रा एजेंसियां सेवाएं रोकती हैं, जिससे पर्यटन क्षेत्र प्रभावित है।

Web Title : US-Iran tensions halt Satara's international travel plans; tours postponed.

Web Summary : Satara residents postpone international trips due to US-Iran tensions. Tours to Dubai, Vietnam, and other destinations are cancelled for safety. Travel agencies halt services until stability returns, impacting the tourism sector significantly.