मराठी साहित्य संमेलनात भासली उदयनराजे भोसले यांची उणीव!, साहित्य रसिकांनी बोलून दाखवली खंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 16:45 IST2026-01-05T16:45:39+5:302026-01-05T16:45:59+5:30
‘राजें’ची नाराजी गुलदस्त्यात, उदयनराजे यांच्यावर तयार करण्यात आलेल्या एका खास गीताचे लोकार्पणावेळी राजेंनी ‘कॉलर’ उडवत दिल्या शुभेच्छा

मराठी साहित्य संमेलनात भासली उदयनराजे भोसले यांची उणीव!, साहित्य रसिकांनी बोलून दाखवली खंत
छत्रपती थोरले शाहू महाराज साहित्यनगरी सातारा : ऐतिहासिक सातारा नगरीत तब्बल ३२ वर्षांनंतर भरलेल्या साहित्य संमेलनाने एक नवा इतिहास रचला. साहित्याचा हा सोहळा एकीकडे साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवत असतानाच, दुसरीकडे या सोहळ्यात खासदार उदयनराजे भोसले यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. साहित्याच्या या दरबारात ‘राजें’ची भेट न झाल्याने राज्यभरातून आलेल्या हजारो चाहत्यांची आणि साहित्यिकांची मात्र निराशा झाली.
सातारा येथील ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील, स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे आणि ज्येष्ठ लेखिका डॉ. तारा भवाळकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य सोहळा झाला. वैचारिक परिसंवाद, कविसंमेलने आणि सांस्कृतिक मेजवानीचा आस्वाद घेण्यासाठी गेल्या चार दिवसांत लाखो साहित्यप्रेमींनी संमेलनात हजेरी लावली. साता-यातील संमेलनाने एक नवा विक्रम प्रस्थापित केला.
संमेलनातील या उत्साहाने अवघी शाहूनगरी न्हाऊन निघाली असली, तरी सातारच्या राजकीय आणि सामाजिक पटलावरील सर्वात मोठे नाव असलेले खासदार उदयनराजे भोसले मात्र या व्यासपीठावर कोठेही दिसले नाहीत, याची खंत मात्र महाराष्ट्र व देशभरातून येणा-या साहित्यिकांनी व्यक्त केली.
उदयनराजे यांचा केवळ सातारा जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण राज्यामध्ये प्रचंड चाहता वर्ग आहे. राजकीय क्षेत्रापलीकडे सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील नागरिक त्यांना भेटण्यासाठी नेहमीच आतुरलेले असतात. साताऱ्यात आल्यानंतर राजेंची भेट होईल, त्यांच्याशी हितगुज करता येईल, अशी मोठी अपेक्षा बाहेरून आलेल्या अनेक साहित्यिकांनी आणि लेखकांनी व्यक्त केली. मात्र, चार दिवस उलटले तरी उदयनराजे संमेलनाकडे फिरकले नाहीत, ज्यामुळे हजारो साहित्य रसिकांनी आपली खंत उघडपणे बोलून दाखवली.
‘राजें’ची नाराजी गुलदस्त्यात ...
राजे या संमेलनात सहभागी झाले असते, तर अनेकांचे त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचे स्वप्न पूर्ण झाले असते आणि संमेलनाला एक वेगळीच उंची लाभली असती, अशा भावना संमेलनस्थळी उमटत होत्या. उदयनराजे नेमके का आले नाहीत? त्यांच्या नाराजी मागील कारणे मात्र गुलदस्त्यात आहेत.
उदयनराजेंच्या ‘त्या’ शैलीची पुन्हा झलक...
संमेलनस्थळी राजे दिसले नसले तरी, रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक सुशील मोझर यांच्या माध्यमातून उदयनराजे यांच्यावर तयार करण्यात आलेल्या एका खास गीताचे लोकार्पण रविवारी ‘जलमंदिर’ या निवासस्थानी पार पडले. यावेळी राजेंनी आपल्या नेहमीच्या अनोख्या शैलीत ‘कॉलर’ उडवत या गाण्याला शुभेच्छा दिल्या. मात्र, संमेलनस्थळाकडे ते फिरकले नाहीत. त्यांची उणीव भासत असताना जलमंदिरवरील त्यांच्या या स्टाईलचा फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने जोरदार रंगली.