साताऱ्याच्या मनोमिलनावर शिवेंद्रराजेंची मोहोर!, मुलाखतीनंतर उदयनराजे थेट ‘सुरुची’वर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 13:59 IST2025-11-11T13:58:46+5:302025-11-11T13:59:17+5:30
आम्ही दोघे भाजपमध्येच : निवडणूक पक्ष म्हणूनच लढविणार

साताऱ्याच्या मनोमिलनावर शिवेंद्रराजेंची मोहोर!, मुलाखतीनंतर उदयनराजे थेट ‘सुरुची’वर
सातारा : भारतीय जनता पार्टीने मोठी जबाबदारी आपल्यावर सोपविली आहे. त्यामुळे जिल्हा म्हणून पक्षाला ताकद देणे आपली जबाबदारी आहे. मी भाजपमध्ये आहे, उदयनराजेदेखील भाजपमध्ये आहेत. आम्ही भाजप म्हणूनच सातारा पालिकेची निवडणूक लढविणार आहोत, असे सांगत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पालिकेतील मनोमिलनावर ‘मोहोर’ उमटविली. नगराध्यक्ष व उमेदवार निवडीचा फैसला पक्षश्रेष्ठीच घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजपच्या वतीने सोमवारी सातारा पालिकेसाठी नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी पदाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, भारतीय जनता पार्टीच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. प्रत्येकाचे काम तोलामोलाचे आहे. भाजपची उमेदवारी मिळावी, अशी अनेकांची मागणी आहे. मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण झाली की, पुढील टप्प्यात नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निश्चित केला जाईल. जिल्ह्यात बहुतांश पालिकांमध्ये मुलाखतीची प्रकिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे उमेदवारांची नावे असलेली संक्षिप्त यादी मंगळवारी मुंबईत आयोजित पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्री तसेच प्रदेशाध्यक्षांकडे सादर केली जाईल.
साताऱ्याचा भावी नगराध्यक्ष कोण असणार, याबाबत छेडले असता ते म्हणाले, ‘जो योग्य आहे, ज्याची प्रतिमा चांगली असेल, ज्याची प्रशासनावर पकड असेल, ज्या व्यक्तीची जनमानसात ओळख आहे, असाच व्यक्ती नगराध्यक्ष म्हणून निवडला जाईल. नगराध्यक्ष पदासाठी दोन्ही आघाड्यांत तसेच मूळ भाजपमधील इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवार निवडीबाबत पक्षश्रेष्ठींकडूनच निर्णय घेतला जाईल.
कराडात भाजपचाच नगराध्यक्ष
कराडात शिंदेसेनेकडून राजेंद्र यादव यांची नगराध्यक्षपदासाठी निवड जाहीर करण्यात आली. याबाबत माध्यमांनी छेडले असता ते म्हणाले, पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आपण महायुतीत आहोत याचे सर्वांनी भान ठेवावे, असे सांगितले होते. यावर आम्ही जो काही पाटणमध्ये महायुती म्हणून निर्णय होईल, तोच जिल्ह्यात इतरत्र होईल, असे स्पष्ट केले होते. कराडात अतुल भोसले भाजपचे आमदार आहेत. या पालिकेत भाजपचा नगराध्यक्ष होईल आणि पालिका भाजपच्या विचाराची होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उदयनराजे ‘सुरुची’वर
भाजपने उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी सोमवारी सायंकाळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांची ‘सुरुची’ या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीचा तपशील समोर आला नसला तरी जागावाटपाबाबत दोन्ही राजेंमध्ये गुफ्तगू झाली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.