Satara: कंटेनरमध्ये कोळशाची ऊब घेणे कामगारांच्या जीवावर बेतले, दोघांचा गुदमरुन मृत्यू; महाबळेश्वरमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 15:34 IST2025-12-31T15:33:42+5:302025-12-31T15:34:31+5:30
रात्री झोपताना ऊब घेण्यासाठी कोळसा आणून घमेल्यात ठेवून पेटवला

संग्रहित छाया
महाबळेश्वर : थंडी वाजू नये म्हणून कोळसा घमेल्यामध्ये ठेवून ऊब घेणे कामगारांच्या जीवावर बेतले. कंटेनरमध्ये रात्री झोपेतच दोघांचा गुदमरुन दुर्देवी मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना महाबळेश्वर तालुक्यातील अहिरमुरा येथे दि. ३० रोजी सकाळी साडेआठ वाजता उघडकीस आली. मतिऊर रेहमान (वय ५३, रा. सिसवा, बिहार) व विपिन तिवारी (वय ५५, रा. गोपालगंज, बिहार) अशी गुदमरून मृत्यू झालेल्या कामगारांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहितीनुसार महाबळेश्वर तालुक्यातील गाढवली ते उत्तरेश्वर या मार्गाचे खडीकरण आणि डांबरीकरणाचे काम सुरू आहे. या ठिकाणी चार कामगार काम करत आहेत. हे कामगार कंटेनरमध्ये रात्री झोपत असत. महाबळेश्वर परिसरात थंडीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे त्यांनी रात्री झोपताना ऊब घेण्यासाठी कोळसा आणून घमेल्यात ठेवून पेटवला. हे घमेले पायाजवळ ठेवून दोघेही रात्री झोपी गेले. मात्र, लवकर उठणारे हे दोघे सकाळी साडेआठपर्यंत का झोपले आहेत, हे पाहण्यासाठी इतर दोन कामगार कंटेनरमध्ये गेले. त्यावेळी दोघेही बेशुद्ध अवस्थेत त्यांना दिसले.
काही नागरिकांना बोलावून त्यांनी दोघांनाही तातडीने तापोळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. डाॅक्टरांनी दोघांनाही तपासले. मात्र, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले. बंद कंटेनरमध्ये कोळशाच्या धुरामुळे गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या घटनेची महाबळेश्वर पोलिस ठाण्यात नोंद झाली असून, दोघांचाही शवविच्छेदन अहवाल येणे बाकी आहे.
सावधगिरी बाळगण्याचे आवाहन
थंड हवामानात ऊबेसाठी कोळसा किंवा धूर निर्माण करणारी साधने बंद जागेत वापरणे अत्यंत धोकादायक आहे. राज्यभरात यापूर्वी बऱ्याचजणांचा अशाप्रकारे जीव गेला आहे. थंडीच्या दिवसांत नागरिकांनी अत्यंत सावधगिरी बाळगणे गरजेचे असल्याचे पोलिसांनी सांगितले.