कोयनेतून सांगलीच्या सिंचनासाठी विसर्ग वाढवला, पायथा वीजगृहाचे दुसरे युनिटही सुरू 

By नितीन काळेल | Published: November 27, 2023 03:30 PM2023-11-27T15:30:26+5:302023-11-27T15:30:56+5:30

पाण्याची मागणीही वाढणार असल्याने राजकीय वाकयुध्दही रंगू लागले

Two TMC of water was released from Koyna Dam for irrigation in Sangli district | कोयनेतून सांगलीच्या सिंचनासाठी विसर्ग वाढवला, पायथा वीजगृहाचे दुसरे युनिटही सुरू 

कोयनेतून सांगलीच्या सिंचनासाठी विसर्ग वाढवला, पायथा वीजगृहाचे दुसरे युनिटही सुरू 

सातारा : कोयना धरणातूनसांगली जिल्ह्यातील सिंचनासाठी दोन टीएमसी पाणी सोडण्यात येत असून आता पायथा वीजगृहाचे दुसरे युनिटही सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पाणी सोडण्याचा वेग वाढून २१०० क्यूसेकवर गेला आहे. तर सांगलीतील सिंचनासाठी दोन महिन्यांत तिसऱ्यांदा पाणी सोडण्यात आलेले आहे.
कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी इतकी आहे.

या धरणातील पाण्यावर सिंचनाच्या तीन मोठ्या पाणी योजना अवलंबून आहेत. सिंचनासाठी सर्वाधिक पाणी सांगलीला जाते. यावर्षी कोयना धरण क्षेत्रात पाऊस कमी झाला. परिणामी धरण पूर्ण क्षमतेने भरलेच नाही. पाणीसाठा ९४ टीएमसीपर्यंत गेलेला. त्यामुळे यंदा वीजनिर्मिती आणि सिंचनाच्या पाणी तरतुदीत कपात होणार असा अंदाज होता. त्यानुसार नियोजन प्रस्तावित केलेले आहे. त्याचबरोबर कमी पावसामुळे राज्यात दुष्काळी स्थिती आहे. 

सांगली जिल्ह्यातही दुष्काळी स्थिती गडद होत चालली आहे. पिण्याच्या पाणी योजनांसह सिंचन पाण्यावर परिणाम झालेला आहे. सिंचनासाठी पाणी मागणी वाढत चालली आहे. त्यामुळे सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी पाणी मागणी झाली होती. यासाठी शनिवारपासून कोयना धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पायथा वीजगृहाचे एक युनिट सुरू करुन १०५० क्यूसेक वेगाने पाणी सोडले जात होते. मात्र, सिंचनासाठी पाण्याची आणखी मागणी वाढल्याने पायथा वीजगृहाचे दुसरे युनिटही सुरू करण्यात आले. त्यामुळे कोयनेतून आता २१०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सांगलीसाठी सुरू झाला आहे. एकूण दोन टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे आणखी काही दिवस पाण्याचा विसर्ग सुरू राहणार आहे. तर सांगलीतील सिंचनासाठी यापूर्वी दोनवेळा पाणी सोडण्यात आले होते.

धरणात ८५ टीएमसी पाणीसाठा..

कोयना धरणातील पाणीपातळी कमी होत चालली आहे. सध्या ८५ टीएमसीच पाणीसाठा शिल्लक आहे. हे पाणी पावसाळ्यापर्यंतच्या सहा महिन्यांसाठी पुरवायचे आहे. त्यातच पाण्याची मागणीही वाढणार असल्याने राजकीय वाकयुध्दही रंगू लागले आहे. उन्हाळ्यात तर पाण्याचे संकट आणखी गहिरे होण्याची भीती आहे. त्याचबरोबर कोयनेप्रमाणचे उरमोडी धरणातील पाण्याबाबतही वाद वाढत चालले आहेत.

Web Title: Two TMC of water was released from Koyna Dam for irrigation in Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.