Satara: कोंडवे येथे चालत्या दुचाकीवर दोघांवर गोळीबार, एक तरुण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 12:16 IST2025-01-28T12:13:22+5:302025-01-28T12:16:26+5:30
एक हल्लेखोर ताब्यात, एक पसार

Satara: कोंडवे येथे चालत्या दुचाकीवर दोघांवर गोळीबार, एक तरुण गंभीर जखमी
सातारा : कोंडवे, ता.सातारा येथे चालत्या दुचाकीवर दोघांवर गोळीबार करण्यात आला असून, यामध्ये एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या पायाच्या पोटरीवर गोळी लागली, तर दुसऱ्या तरुणाच्या कमरेला गोळी चाटून गेल्याने तोही यात जखमी झाला. या घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेने एका हल्लेखोराला तातडीने ताब्यात घेतले असून, त्याच्याकडे कसून चाैकशी सुरू आहे. ही घटना सोमवारी घडली.
अमर गणेश पवार (वय २१, रा.मोळाचा ओढा, सातारा), श्रेयस सुधीर भोसले (वय २१, रा.तामजाईनगर, सातारा) अशी जखमींची नावे आहेत. अमर पवार आणि श्रेयस भोसले हे दोघे मेढा येथे न्यायालयात तारखेसाठी गेले होते. दुपारी तीननंतर ते दुचाकीवरुन साताऱ्याला यायला निघाले. कोंडवे येथील एका पेट्रोलपंपासमोर आल्यानंतर दुचाकीवर असलेल्या दोघा हल्लेखोरांपैकी एकाने पिस्तुलातून अमर पवार याच्यावर गोळीबार केला. यावेळी एक गोळी अमर याच्या उजव्या पायाच्या पोटरीला लागली, तर दुसरी गोळी श्रेयसच्या कमरेला खरचटून गेल्याने तोही यात जखमी झाला. गोळीबार केल्यानंतर संबंधित हल्लेखोरे तेथून मोळाचा ओढ्याकडे पसार झाले.
कोंडवे येथे गोळीबार झाल्याचे समजताच, पोलिस अधीक्षक समीर शेख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर, पोलिस निरीक्षक नीलेश तांबे यांच्यासह एलसीबीची टीम घटनास्थळी पोहोचली. त्यानंतर, पंचनामा करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. त्यातील पेट्रोलपंपावरील सीसीटीव्हीमध्ये हा सारा घटनाक्रम कैद झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्या आधारे पोलिसांनी एका हल्लेखोराला तातडीने साताऱ्यातून ताब्यात घेतले, तर त्याचा दुसरा साथीदार फरार आहे.
कास येथे काही दिवसांपूर्वी बारबालाच्या डान्सवरून बाचाबाची झाली होती. त्यातून हा हल्ला पाळत ठेवून झाला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या तपासात पुढे येत आहे.
नेम चुकला.. अन् थोडक्यात वाचला
अमर पवार हा दुचाकीवर पाठीमागे बसला होता, तर श्रेयस भोसले हा दुचाकी चालवत होता. दोघा हल्लेखोरांनी चालत्या दुचाकीवर अमर पवारवर नेम धरला. मात्र, त्यांच्या दुचाकीचा वेग जास्त असल्यामुळे हल्लेखोराचा नेम चुकला. त्यामुळे पिस्तुलातून सुटलेली गोळी अमरच्या पायाच्या पोटरीवर लागली, अन्यथा मोठा अनर्थ घटला असता, असे पोलिसांनी सांगितले.