Satara Crime: प्रेमविवाह केल्याच्या रागातून दोघांचे अपहरण, मारहाण करुन ठार मारण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 13:07 IST2025-09-15T13:06:57+5:302025-09-15T13:07:17+5:30
मारहाण केल्यानंतर संशयितांनी दोघांना कराडजवळील कोल्हापूर नाक्यावर आणून सोडले

Satara Crime: प्रेमविवाह केल्याच्या रागातून दोघांचे अपहरण, मारहाण करुन ठार मारण्याची धमकी
कराड : कराडजवळील ओगलेवाडीतून दोघा युवकांचे प्रेमविवाह केल्याच्या रागातून चौघांनी अपहरण करून त्यांना शिराळा तालुक्यात मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, मारहाण केल्यानंतर संशयितांनी दोघांना कराडजवळ पुन्हा आणून सोडत पोलिसांत तक्रार केल्यास जिवंत ठेवणार नसल्याची धमकी दिल्याचे शहर पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीत म्हटले आहे.
आदिनाथ भाऊ गुरव (रा. हजारमाची, ता. कराड) याने याप्रकरणी अनिकेत अशोक माळी, अविनाश अशोक माळी, अजिंक्य अशोक माळी या तिघांसह अनोळखी व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे.
आदिनाथ गुरव हा सेंट्रिंग व्यवसाय करतो. १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास संदेश सतीश ताटेला करवडी फाटा येथून आण, असा फोन सनी सूर्यवंशी यांनी आदिनाथ गुरव याला केला होता. त्यानंतर करवडी फाटा परिसरात आदिनाथ गुरव गेल्यानंतर अचानकपणे एका चारचाकीतून संशयित उतरले आणि त्यांनी संदेश ताटे याला शिवीगाळ व मारहाण केली.
त्यावेळी आदिनाथ गुरव याने संदेश ताटे याला सोडवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी आदिनाथ याला प्रेमविवाह केल्याच्या रागातून जबर मारहाण केली. मारहाणीनंतर संदेश ताटे आणि आदिनाथ गुरव या दोघांना चारचाकीत घालून शिराळा तालुक्यातील खेड गावाच्या परिसरात घेऊन गेले.
गाडीत घालताना ताटे याला चाकूची मूठ मारण्यात आली. तसेच खेड येथे लाकडी दांडक्याने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मारहाण केल्यानंतर संशयितांनी दोघांना कराडजवळील कोल्हापूर नाक्यावर आणून सोडत पोलिसात तक्रार केल्यास जिवंत ठेवणार नसल्याची धमकी दिली असल्याचे आदिनाथ गुरव यांनी तक्रारीत म्हटले आहे.