झाड मारल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल; ॲसिड प्रयोग केल्याची घटना

By प्रगती पाटील | Published: March 26, 2024 09:12 PM2024-03-26T21:12:12+5:302024-03-26T21:12:41+5:30

पालिकेची सर्तकता : हरित साताराच्या लढ्याला यश : झाडांना इजा पोहोचविणाऱ्यांवर कारवाइचा बडगा

Two cases have been registered in connection with killing a tree | झाड मारल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल; ॲसिड प्रयोग केल्याची घटना

झाड मारल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल; ॲसिड प्रयोग केल्याची घटना

सातारा : शहर व परिसरात सार्वजनिक ठिकाणी असलेल्या झाडांच्या जीवावर उठणाऱ्या प्रवृत्तीला आळा बसविण्यासाठी सातारा पालिका आक्रमक झाली आहे. पालिकेच्यावतीने सायन्स काॅलेजसमोर झाडावर अॅसिड प्रयोग करणाऱ्या विरोधात आणि देवी काॅलनीत परवानगी शिवाय झाड तोडणाऱ्या तिघांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सातारा येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स महाविद्यालयासमोर अज्ञाताने झाडावर अॅसिड प्रयोग केल्याची घटना समोर आली. ही बाब हरित सातारा या पर्यावरणीय ग्रुपच्यावतीने पालिकेला सांगण्यात आली. १८ मार्च रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आल्यानंतर याचा पंचनामा करण्यात आला.  कोणत्याही परवानगीशिवाय वृक्ष नष्ट केल्याचा गुन्हा अज्ञातावर दाखल करण्यात आला आहे. याबरोबरच सदरबझार येथील देवी काॅलनीत ८ जानेवारी रोजी सायंकाळी रस्त्याच्या कडेला असलेल्या चाफ्याचे सुमारे सात फुट वाढलेले झाड, त्याच्या शेजारी असणारा बहावा आणि सप्तपर्णीचे झाड कोणत्याही परवानगीशिवाय नष्ट केल्याचा ठपका ठेऊन देवी काॅलनीतील अमर लक्ष्मण जाधव आणि दिग्विजय अमर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पालिका वृक्ष विभाग प्रमुख सुधीर चव्हाण यांनी दिली. 

१. पालिकेच्या धडक कारवाइचे पर्यावरण प्रेमींकडून काैतुक

सार्वजनिक जागेवर असलेल्या वृक्षांची होणारी कत्तल साताऱ्यात गंभीर रूप धारण करत आहे. शहरात दोन आठवड्यात तब्बल चार घटना उघडकीस आल्याने पालिकाही अॅक्शन मोडवर आली. जागेचा पंचनामा करून योग्य त्या कार्यवाहीसाठी प्रस्ताव मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्याकडे सादर केल्यानंतर त्यावर तातडीने कारवाइ करण्याचे आदेश त्यांनी दिले. वृक्ष विभाग प्रमुख सुधीर चव्हाण यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेत गुन्हा दाखल करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. झाड मारल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करून पर्यावरण रक्षणासाठी पालिकेने घेतलेल्या भूमिकेचे विविध स्तरांतून काैतुक होत आहे.


पर्यावरणीय दृष्ट्या वृक्ष लागवड आणि संवर्धन या दोन्ही गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी वृक्षांची अडचण वाटून त्यांना संपविण्याची वृत्ती साताऱ्यात वाढत आहे. यावर आळा बसविण्यासाठी हरित सातारा जागल्याची भूमिका बजावत आहे. त्याला प्रशासनाचे बळ मिळाल्याने झाडांची कत्तल होणे निश्चितच थांबेल असा विश्वास आहे.
- कन्हैय्यालाल राजपुरोहित, हरित सातारा

Web Title: Two cases have been registered in connection with killing a tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.