Crime News Satara: बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 18:59 IST2022-08-02T18:58:54+5:302022-08-02T18:59:52+5:30
बेलवडे हवेली येथील दोन युवकांकडे पिस्तूल असल्याची माहिती या पथकाला मिळाली होती.

Crime News Satara: बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना अटक
कऱ्हाड : चायना बनावटीचे पिस्तूल बेकायदेशीररीत्या बाळगल्याप्रकरणी दोन युवकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. ही कारवाई बेलवडे हवेली, ता. कऱ्हाड येथे तळबीड पोलीस ठाण्याच्या पथकाने सोमवारी सायंकाळी केली. योगेश अंकुश पवार (वय ३७) व समाधान जालिंदर देशमुख (१९, दोघेही रा. बेलवडे हवेली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीसप्रमुख अजयकुमार बन्सल यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत. या आदेशानुसार तळबीड पोलिसांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात तपास करण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक जयश्री पाटील, सहायक फौजदार सूर्यकांत देशमुख, पोलीस नाईक संदेश दीक्षित, कॉन्स्टेबल प्रवीण फडतरे, कॉन्स्टेबल नीलेश विभुते यांचे पथक कार्यरत आहे. विभागात तपास करीत असताना बेलवडे हवेली येथील दोन युवकांकडे पिस्तूल असल्याची माहिती या पथकाला मिळाली.
त्यानुसार पथकाने माहितीची खातरजमा करून सोमवारी सायंकाळी गावात छापा टाकला. संबंधित दोन्ही युवकांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे चायना बनावटीचे पिस्तूल आढळून आले. संबंधित पिस्तुलाची किंमत सुमारे ५० हजार रुपये असून पोलिसांनी ते जप्त केले आहे. याबाबतची नोंद तळबीड पोलिसात झाली आहे. सहायक पोलीस निरीक्षक जयश्री पाटील व सहायक फौजदार मुळीक तपास करीत आहेत.