Satara: फटाक्यांनी केला घात; कोरेगावात आगीमध्ये दोन एकर ऊस जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 16:54 IST2025-10-15T16:53:15+5:302025-10-15T16:54:30+5:30
पाच लाख रुपयांचे नुकसान

Satara: फटाक्यांनी केला घात; कोरेगावात आगीमध्ये दोन एकर ऊस जळून खाक
कोरेगाव : कोरेगाव - जळगाव - सातारा रोड रस्त्यावर हनुमाननगर परिसरात मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता अचानक लागलेल्या आगीत बाबूराव दिनकरराव बर्गे व जयवंत रामचंद्र बर्गे यांच्या दोन एकर शेतातील आडसाली ऊस जळून खाक झाला. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत आग आटोक्यात आणली. या आगीत सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार ऊस शेताजवळ रहिवासी वसाहत असून तेथील लहान मुले दिवाळीच्या तोंडावर फटाके उडवत असताना त्यातील ठिणगी पडून ऊस शेतीला आग लागली. बघता-बघता वाऱ्यामुळे आग वाढतच गेली. घटनेची माहिती मिळताच बाबूराव बर्गे, सुरेश बर्गे व जयवंत बर्गे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
स्थानिक नागरिक निवास बनसोडे, सुभाष बनसोडे, अफताब मुल्ला, अनिकेत ठिगळे, दस्तगीर सय्यद, शरीफ सय्यद, निखिल बनसोडे, हैदर कुरेशी, भूषण बनसोडे, मुन्ना कुरेशी, अल्फाज कुरेशी, अरबाज शेख, ऋषिकेश ठिगळे, गणेश बनसोडे, तोहीद शेख, वाहिद शेख, युसूफ शेख, अफजल कुरेशी, फैयाज शेख, कादिर कुरेशी यांच्यासह स्थानिक नागरिकांनी आपल्या राहत्या घरातील कूपनलिकांच्या साह्याने पाण्याचा मोठा फवारा मारत आग आटोक्यात आणली. शेतालगतच्या नागरिकांनी घराच्या टेरेसवरून पाण्याच्या बादल्या ओतून आग आटोक्यात आणण्यात मदत केली.
पाच लाख रुपयांचे नुकसान
दोन एकर शेतामध्ये आडसाली उसाची लागण केली होती. आता ऊस १८ महिन्यांचा झाला होता, तसेच तो चाळीस कांड्यांवर होता. या उसासाठी ठिबक सिंचन व्यवस्था करण्यात आली होती. शेतातील ऊस पूर्णपणे जळून खाक झाला असून सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती शेतकरी सुरेश बर्गे व जयवंत बर्गे यांनी दिली.