Satara: स्तनपान करताना उलटी झाली, फुप्फुसात अडकल्याने चिमुकली दगावली; कऱ्हाड येथील दुर्दैवी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 15:23 IST2025-08-09T15:23:05+5:302025-08-09T15:23:38+5:30
कुटुंबीयांना जबर मानसिक धक्का

संग्रहित छाया
सातारा : तळबीड, ता. कऱ्हाड येथून एक दुर्दैवी घटना समोर आली असून, एका २० दिवसांच्या चिमुकलीच्या फुप्फुसात उलटी अडकल्याने यातच तिचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना बुधवारी, (दि. ६) घडली.
वेदिका संताजी कांबळे (वय २० दिवस, मूळ रा. कोडोली पारगाव, ता. हातकणंगले, कोल्हापूर, सध्या रा. भुईगल्ली, तळबीड, ता. कऱ्हाड) असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. याबाबत तळबीड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वेदिका हिला तिची आई अंकिता ही स्तनपान करीत होती. त्यावेळी चिमुकलीला उलटी झाली. तिला त्रास होऊ लागल्याने कऱ्हाड येथील काॅटेज हाॅस्पिटलमध्ये तातडीने दाखल करण्यात आले; परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.
आपल्या तान्ह्या मुलीचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबीयांना जबर मानसिक धक्का बसला आहे. रुग्णालयासमोर कुटुंबीयांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. या दुर्दैवी घटनेची काॅटेज हाॅस्पिटलचे डाॅ. तुषार नाळे यांनी तळबीड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आईने काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक
बाळाच्या फुप्फुसांमध्ये उलटी अडकली जाऊ नये, यासाठी आईने काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. बाळाला दूध पाजल्यानंतर त्याला काही वेळ सरळ स्थितीत ठेवावे, तसेच त्याला थोडेसे उंच उशीवर किंवा आपल्या मांडीवर ठेवून पाठीवरून थोपटल्यास उलटी होण्याची शक्यता कमी होते. दूध पाजल्यानंतर बाळाचा ढेकर काढणे गरजेचे असते. -अरुंधती कदम, बालरोगतज्ज्ञ, सातारा