Satara: महामार्गावर उभ्या कंटेनरला ट्रकची पाठीमागून धडक; तिघे गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 13:12 IST2025-11-07T13:12:18+5:302025-11-07T13:12:43+5:30
दोन महामार्ग कर्मचाऱ्यांचा समावेश, अपघातस्थळी तिसरा ट्रकही अडकला

Satara: महामार्गावर उभ्या कंटेनरला ट्रकची पाठीमागून धडक; तिघे गंभीर जखमी
मलकापूर : पंक्चर झाला म्हणून महामार्गाच्या कडेला उभ्या केलेल्या कंटेनरला भरधाव ट्रकची पाठीमागून धडक बसली. या अपघातात सुरक्षा गार्ड लावण्यासाठी आलेल्या दोन महामार्ग कर्मचाऱ्यांसह ट्रकचालक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मलकापूर हद्दीत बुधवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास झाला. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
अविदास कीर्तने (वय २८, रा. कार्वे नाका, कराड), जशवंत जाधव (३५, रा. टाके वस्ती, चाचेगाव, ता. कराड), वजीर (६१, रा. बंगळुरू) अशी गंभीर जखमी झालेल्या तिघांची नावे आहेत.
अपघातस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनर क्रमांक (एमएच २३ एयू २०८०) हा कोल्हापूरकडून सातारा दिशेला जात होता. टायर पंक्चर झाल्यामुळे महामार्गाच्या कडेला उभा केला होता. कंटेनरला डीपी जैन कंपनीचे दोन कर्मचारी सुरक्षा गार्ड लावून कंटेनरसमोर उभे होते. त्याचवेळी सातारा दिशेला निघालेल्या भरधाव ट्रक क्रमांक (केए ०३ एजी ९८६१)च्या चालकाचा ट्रकवरील ताबा सुटून कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. कंटेनरला धडक बसताच सुरक्षा गार्ड लावण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर आला. या अपघातात या दोन कर्मचाऱ्यांसह ट्रकचालक गंभीर जखमी झाला आहे.
ही धडक एवढी जोरात होती की, कंटेनर दोन मीटर पुढे सरकला तर ट्रकचालक केबिनमध्येच अडकून पडला होता. अपघाताची माहिती मिळताच डीपी जैनचे दस्तगीर आगा, संभाजी घुटुगडे, जगन्नाथ थोरात, सुनील कदम, अमृत बाबर, राहुल कदम, विकास कुमार, अशोक कुमार, बिपेन्दो सरखेल तातडीने अपघातस्थळी दाखल झाले. केबिनमध्ये अडकून पडलेल्या ट्रक चालकाला कटावणीच्या साह्याने बाहेर काढण्यात आले. दोन जखमी कर्मचाऱ्यांसह चालकाला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर ताबडतोब क्रेन बोलावून अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली.
अपघातस्थळी तिसरा ट्रकही अडकला
अपघातग्रस्त वाहने महामार्गावरच असल्याने अन्य एक ट्रकचालक ट्रक साईडने घेत असताना पाठीमागचे चाक नाल्यात गेल्याने तोही त्याच ठिकाणी अडकून पडला. तीनही वाहने एकत्र असल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. वाहतूक दुसऱ्या लेनवरून वळवून तिन्ही वाहने क्रेनच्या साह्याने बाजूला केली.