Satara: खंडाळ्यात थरार; दोन ट्रक पलटी, नियंत्रण सुटल्याने तीन वाहनांना ठोकले, तिघे जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 13:17 IST2025-10-17T13:17:14+5:302025-10-17T13:17:48+5:30
खंडाळा : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर खंडाळ्यामध्ये नियंत्रण सुटल्याने ट्रकचालकाने दुचाकी, एसटी व ट्रक अशा तीन वाहनांना ठोकरले. या अपघातामध्ये ...

Satara: खंडाळ्यात थरार; दोन ट्रक पलटी, नियंत्रण सुटल्याने तीन वाहनांना ठोकले, तिघे जखमी
खंडाळा : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर खंडाळ्यामध्ये नियंत्रण सुटल्याने ट्रकचालकाने दुचाकी, एसटी व ट्रक अशा तीन वाहनांना ठोकरले. या अपघातामध्ये दोन्ही ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाले असून एकूण तीनजण जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवार, (दि.१५) रात्रीच्या सुमारास झाला. प्रकाश आनंदराव वाडकर, लकीसिंग केसरसिंग रावत, विनोद रतन जाट अशी अपघातामध्ये जखमी झालेल्यांची नावे आहेत.
महामार्गावर खंडाळ्यामध्ये पुण्याच्या दिशेने जाताना असणाऱ्या एका हॉटेलजवळ विनोद रतन जाट या चालकाचे ट्रकवरील (आरजे. ५१, जीए. १०६५) नियंत्रण सुटल्याने ट्रकने समोर चाललेल्या दुचाकी (एमएच. ११, डीएल. २३८६) व एसटी बस (एमएच. १०, डीटी. ३८६३) यांना ठोकरले. यानंतर समोरील बाजूला असलेल्या वळणावर ट्रक (आरजे. २७, जीइ. ३९९०) ला पाठीमागून धडक दिली.
ही धडक इतकी भयानक होती की धडक देणाऱ्या ट्रकची केबिनची बाजू दुसऱ्या ट्रकच्या हौद्यात अडकून दोन्ही ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाले. धडक देणाऱ्या ट्रकची केबिन चेपल्याने चालक अडकला होता. उपस्थितांच्या मदतीने प्रयत्न करण्यात आले. परंतु चालकाला बाहेर निघता येत नव्हते. शेवटी क्रेनच्या साहाय्याने ट्रकचा अडकलेला भाग ओढून चालकाला बाहेर काढण्यात आले.
या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु वाहनांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे. प्रकाश आनंदराव वाडकर (वय २९, रा. बावधन, ता वाई), लकिसिंग केसरसिंग रावत (रा. बडलिया, ता. पंचकोट, जि. अजमेर राजस्थान), विनोद रतन जाट (२२, रा. सिकरानी ता. विजयनगर जि. बियावर राजस्थान) हे अपघातात जखमी झाले. याप्रकरणी विकास दत्तात्रय गिरी याने दिलेल्या फिर्यादीवरून खंडाळा पोलिस स्टेशनला ट्रकचालक विनोद जाट याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस फौजदार अशोक जाधव तपास करीत आहेत.