Satara: खंडाळ्यात 'एस कॉर्नर'ला ब्रेकफेल ट्रकचा थरार.., महामार्गावर उडाली खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 13:23 IST2025-08-06T13:23:20+5:302025-08-06T13:23:20+5:30
पहिलीच खेप अन् ट्रक पलटी

Satara: खंडाळ्यात 'एस कॉर्नर'ला ब्रेकफेल ट्रकचा थरार.., महामार्गावर उडाली खळबळ
खंडाळा : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर खंडाळ्यातील एस कॉर्नर परिसरात झालेल्या अपघातात ब्रेकफेल मालट्रकने समोरील वाहनाला धडक देऊन पुढे बेंगरूटवाडीच्या कच्चा रस्त्यावर जाऊन ट्रक पलटी झाला. क्षणार्धात घडलेल्या अपघाताच्या थराराने महामार्गावर खळबळ उडाली.
यामध्ये घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवार, दि. ५ रोजी साखर वाहतूक करणारा मालट्रक (एमएच १० सीआर ४१९७) हा सांगलीहून साखर भरून मुंबईला निघाला होता. दरम्यान, मालट्रक खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर एस कॉर्नर परिसरातील कॅनॉलजवळ आला असता ट्रकचा एअरपाइप फुटल्याने ब्रेक निकामी झाला.
यामुळे चालक लखन भिवा दुधाळ (मु.पो. खवे, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) याचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रकची समोर जाणाऱ्या चारचाकी (एमएच १४ डीएन १५९६) वाहनाला जोरदार धडक बसली व ट्रक पुढे जाऊन शेजारी असणाऱ्या बेंगरूटवाडीच्या कच्च्या रस्त्यावर जाऊन पलटी झाला. या अपघातामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही परंतु चारचाकी वाहनातील एक महिला गंभीर जखमी झाली व दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे.
अपघाताची माहिती मिळताच खंडाळाचे पोलिस अंमलदार प्रकाश फरांदे, संजय पोळ, संजय जाधव व शिरवळ रेस्क्यू टीम तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठवण्यात आले. या अपघाताची नोंद करण्याचे काम खंडाळा पोलिस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
पहिलीच खेप अन् ट्रक पलटी
या अपघातामधील ट्रकचा चालक लखन दुधाळ हा बदली चालक म्हणून आला होता. आधीचा चालक कामानिमित्त सुट्टीवर असल्याने लखनला बोलवण्यात आले व पहिल्याच खेपेत ट्रक पलटी झाल्याने ट्रकचालक प्रचंड घाबरला होता.