Satara Crime: नुडल्सच्या नावाखाली टेम्पो भरून मद्याची वाहतूक, पन्नास लाखांवर मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 16:27 IST2023-02-15T16:24:41+5:302023-02-15T16:27:02+5:30
याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

Satara Crime: नुडल्सच्या नावाखाली टेम्पो भरून मद्याची वाहतूक, पन्नास लाखांवर मुद्देमाल जप्त
कऱ्हाड : नुडल्सच्या नावाखाली तब्बल ५० लाखांच्या गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची वाहतूक करणारा टेम्पो पकडण्यात आला. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कऱ्हाड तालुक्यातील मालखेड गावच्या हद्दीत सातारच्या उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
ओमकारलाल भगवानलाल मेहता (रा. अदकालीया, जि. उदयपूर, राजस्थान) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे-बंगळुरू महामार्गावरून गोव्याहून नाशिककडे निघालेल्या टेम्पोमधून गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती सातारच्या उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यानुसार या पथकाने मंगळवारी कऱ्हाड तालुक्यातील मालखेड गावच्या हद्दीत सापळा रचला.
त्यावेळी एक टेम्पो कोल्हापुरहून साताऱ्याच्या दिशेने जाताना या पथकाला दिसला. पथकाने हा टेम्पो अडवला. चालकाकडे चौकशी केली असता टेम्पोच्या हौद्यात नुडल्स असल्याचे त्याने सांगितले. मात्र, पथकाने टेम्पोच्या हौद्याची तपासणी केली असता टेम्पोमध्ये १८० मिली क्षमतेच्या विदेशी दारूच्या १९ हजार २०० बाटल्या, ७५० मिली क्षमतेच्या १ हजार ५०० बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी दारुसह टेम्पो असा ५२ लाख ७८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूरचे विभागीय उपायुक्त डॉ. एच. बी. तडवी व सातारचे अधीक्षक वैभव वैद्य यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक किरण बिरादार, एन. पी. क्षीरसागर, शरद नरळे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक महेश मोहिते, नितीन जाधव, सचिन खाडे, संतोष निकम, अजित रसाळ, जीवन शिर्के, किरण जंगम, भीमराव माळी, सचिन जाधव यांनी ही कारवाई केली. दुय्यम निरीक्षक किरण बिरादार तपास करीत आहे.