पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मलकापूरकरात सलग पाचव्या दिवशीही वाहतूक कोंडी, वाहनधारकांमधून संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 17:00 IST2025-12-30T16:59:37+5:302025-12-30T17:00:08+5:30
महामार्गाच्या कोल्हापूर-पुणे मार्गिकेवर पाच किलोमीटरपर्यंत रांगा

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मलकापूरकरात सलग पाचव्या दिवशीही वाहतूक कोंडी, वाहनधारकांमधून संताप
मलकापूर : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कराडमधील कोल्हापूर नाक्यावर अरुंद रस्ता... त्यातच वाहनांची वर्दळ तर दुसऱ्या बाजूला कृषी प्रदर्शनामुळे वाहनांची गर्दी झालेली होती. यामुळे महामार्गाच्या कोल्हापूर-पुणे मार्गिकेवर दिवसभर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पुणे-मुंबईला जाण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना सुमारे दीड ते दोन तास वाहतूक कोंडीत अडकावे लागले. मलकापूरकरांना सलग पाचव्या दिवशीही या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला.
पुणे-बेंगलोर आशियाई महामार्गावर मलकापूर हद्दीत नेहमीच वाहतुकीची वर्दळ असते. त्यातच सलग सुट्या संपल्यामुळे पुणे-मुंबईला जाणाऱ्या वाहनांची खूपच वर्दळ वाढली आहे. मलकापुरात सध्या महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. या सहापदरीकरणाच्या कामामुळे अचानक बदल करून काही ठिकाणी कोल्हापूर-सातारा लेनवरील वाहतूक उपमार्गावरून वळवलेली आहे. कोल्हापूर नाका ते कोयना पूल परिसरात भराव पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी रस्ता अरुंद झाला आहे.
अरुंद रस्त्यावरून संपूर्ण महामार्गासह पाटण खोऱ्यात जाणारी वाहतूक जाते. त्या ठिकाणी मध्येच एसटीसह खासगी प्रवासी वाहतूक बस व वडापवाले वाहने उभी करून प्रवासी भरत असतात. त्यामुळे कोल्हापूर पुणे लेनवर वाहतूक कोंडी झाली आहे. ही वाहतूक कोंडी होऊन कोल्हापूर नाका ते पाचवड फाटा परिसरात पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ही वाहतूक कोंडी फोडण्यात महामार्गाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराचे दुर्लक्ष व देखभाल विभागाचा गलथानपणा चव्हाट्यावर येत आहे. तर या वाहतूक कोंडीवर पर्याय काढण्यासाठी वाहतूक पोलिसांना पूर्णपणे अपयश येत आहे.