Pune Bengaluru Highway Traffic: दिवाळी सुटीमुळे धरली गावाकडची वाट, पुणे-बंगळुरू महामार्गावर वाहतुकीची कोंडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 13:03 IST2025-10-18T13:02:55+5:302025-10-18T13:03:46+5:30
Pune Bengaluru Highway Traffic Update: दिवाळी सुटीचा उत्साह महामार्गावरील ट्रॅफिकमध्ये हरवणार

Pune Bengaluru Highway Traffic: दिवाळी सुटीमुळे धरली गावाकडची वाट, पुणे-बंगळुरू महामार्गावर वाहतुकीची कोंडी
दीपक देशमुख
सातारा : पुणे-बंगळुरू महामार्गावरील सातारा-कोल्हापूरदरम्यानचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ‘एनएचआय’ने ठेवले असले, तरी प्रत्यक्षात कामाची गती अत्यंत मंद आहे. नागठाणे, उंब्रज, मलकापूर येथे तर वाहने कासवगतीने जात असून, अनेकदा वाहतूक ठप्प होते आहे. त्यातच दिवाळी सुटीसाठी हजारो चाकरमानी मुंबई-पुण्याहून गावाकडे रवाना होणार आहेत. मात्र, त्यांचा आनंद महामार्गावरील वाहतूककोंडीतच हरवण्याची चिन्हे आहेत.
पुणे-बंगळुरू महामार्गावर सातारा जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होत आहे. विशेषतः मलकापूर, उंब्रज, नागठाणे परिसरात वाहने तासभर तरी अडकून पडलेली असतात. आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हजारो चाकरमानी मुंबई आणि पुण्याहून गावाकडे जाणार आहेत. दिवाळी सोमवारी असल्याने शनिवार-रविवारी कोल्हापूर बाजूकडे जाणाऱ्या लेनवर वाहनांची संख्या प्रचंड वाढणार आहे. यामुळे सुट्यांचा पहिला दिवसच वाहतूककोंडीचा सामना करण्यात जाण्याची शक्यता आहे.
मलकापूर, उंब्रज, नागठाणे महामार्गाची कामे बाकी असल्यामुळे हजारो वाहनांना सेवारस्त्यांवर यावे लागते. यावेळी वाहनचालकांमध्ये वादावादीही होत आहे. शनिवार-रविवारी तर कराड-सातारादरम्यान चक्काजाम झाल्यासारखी परिस्थिती असते. राष्ट्रीय महामार्गाला साजेसा उपयोग नागरिकांना होत नसल्याने टोल आकारणीबाबत फेरविचार करण्याची मागणी पुढे येत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे.
प्रदूषणात वाढ
हजारो वाहने रस्त्यावर धूर ओकत थांबून राहिल्याने इंधनाचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत आहेच. शिवाय ध्वनी आणि वायुप्रदूषणातही वाढ होत आहे.
बेशिस्त अवजड वाहनांमुळे अडचणीत भर
महामार्गावर काम सुरू असल्याने होणाऱ्या वाहतूककोंडीत अवजड वाहनांचे बेशिस्त चालक भर घालत आहेत. नियमांनुसार ट्रक, ट्रेलर यांसारखी अवजड वाहने डाव्या लेनने जावी लागतात; परंतु प्रत्यक्षात ही वाहने सर्रास मधल्या आणि उजव्या लेनवरून जातात. यामुळे हलक्या वाहनांना ओव्हरटेक करण्याची वेळ वारंवार येते. यामुळे अपघाताचीही शक्यता वाढत आहे. महामार्गावरील वाहतूक पोलिसांना हे प्रकार कधी दिसणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
कोंडीतून सुटताच वाहने बुंगाट
वाहतूककोंडीत तासन्तास अडकल्याने चालकांचा संयम सुटतो. त्यामुळे कोंडीतून सुटका होताच ते गमावलेला वेळ भरून काढण्यासाठी वाहनांचा वेग वाढवतात. परिणामी अपघाताचा धोका वाढतो.