Satara: ट्रॅक्टर पलटी होऊन चालक जागीच ठार, ओव्हरटेक करताना झाला अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 15:55 IST2025-01-29T15:55:18+5:302025-01-29T15:55:37+5:30
कऱ्हाड : रेठरे खुर्द येथील ओढ्यावरील पुलावरून उसाचा मोकळा ट्रॅक्टर पलटी होऊन खाली पडल्याने चालक जागीच ठार झाला. ही ...

Satara: ट्रॅक्टर पलटी होऊन चालक जागीच ठार, ओव्हरटेक करताना झाला अपघात
कऱ्हाड : रेठरे खुर्द येथील ओढ्यावरील पुलावरून उसाचा मोकळा ट्रॅक्टर पलटी होऊन खाली पडल्याने चालक जागीच ठार झाला. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. संतोष दत्ता जाधव (वय २५, मूळ रा. जालना, सध्या रा. कोकरूड तर्फ माळेवाडी, ता. शिराळा) असे ठार झालेल्या चालकाचे नाव आहे. ट्रॅक्टर मालक सत्यजित रावसाहेब सरनोबत (रा. इस्लामपूर) यांनी कऱ्हाड तालुका पोलिसांत दिली आहे.
रेठरे बुद्रुक येथील शिवारातील तोडलेला ऊस संतोष जाधव हे ट्रॅक्टर ट्रॉलीतून वाहतूक करत करंगुली येथील निनाईदेवी दालमिया शुगर्स साखर कारखान्यावर गेले होते. मंगळवारी दुपारी करंगुलीकडून रेठरे बुद्रुक येथे येत असताना रेठरे खुर्द येथील कमळाच्या झाडाच्या वळशाजवळ ओढ्यावरील पूल आहे. तेथून उसाच्या बैलगाड्या कृष्णा कारखान्याकडे चालल्या होत्या.
याचवेळी जाधव चालवत असलेला ट्रॅक्टर मागे असताना बैलगाड्यांना ओव्हरटेक करून तो पुढे जाताना समोरून अचानक दुसरे वाहन आले असताना चालक संतोष जाधव यांचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर व दोन ट्रॉली पुलाचा कठडा तोडून ओढ्यात कोसळल्या. त्यात ट्रॅक्टरखाली सापडल्याने संतोष जाधव हे जागीच ठार झाले.
यानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती. संतोष जाधव यांचा मृतदेह कऱ्हाडच्या उपजिल्हा रुग्णालयात सायंकाळी शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. शवविच्छेदन झाल्यानंतर रात्री उशिरा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. संतोष जाधव यांच्या मागे पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.