Crime News Satara: डोक्यात गोळी झाडून खून करणारे तिघे अल्पवयीन ताब्यात, चोवीस तासांत खुनाचा उलगडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 16:35 IST2022-07-04T16:27:22+5:302022-07-04T16:35:32+5:30
संशयित आरोपी पुण्यात असल्याचे समजताच पथकाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले.

Crime News Satara: डोक्यात गोळी झाडून खून करणारे तिघे अल्पवयीन ताब्यात, चोवीस तासांत खुनाचा उलगडा
सातारा : येथील नटराज मंदिरासमोर अर्जुन मोहन यादव (वय २६, रा. लाखानगर, वाई, जि. सातारा) याचा डोक्यात गोळी घालून खून करणाऱ्या तिघा अल्पवयीन मुलांना स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या चोवीस तासांत ताब्यात घेतले. त्यांनी खून कोणत्या कारणातून व कशासाठी केला, हे अद्याप समोर आले नसून पोलीस त्यांच्याकडे कसून चौकशी करत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, वाई शहरातून तडीपार असलेला अर्जुन यादव हा शनिवारी (दि.२) दुपारी साडेतीनच्या सुमारास नटराज मंदिराजवळ आला होता. यावेळी अज्ञातांनी त्याच्या डोक्यात गोळी झाडून त्याचा खून केला. या घटनेनंतर साताऱ्यात प्रचंड खळबळ उडाली होती. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी घटनास्थळी भेट देऊन तातडीने आरोपींना अटक करा, असे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले.
या खुनानंतर एलसीबीची टीम दोन भागात विभागून विविध ठिकाणी रवाना झाली. त्यापैकी पुण्याला गेलेल्या पथकाला या खूनप्रकरणामध्ये तीन अल्पवयीन मुले असल्याचे समजले. ही तिन्हीही मुले पुण्यात असल्याचे समजताच या पथकाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. यामध्ये आणखी दोघांचा समावेश असल्याचे तपासात पुढे येत असून, संबंधित दोघे फरार आहेत.
एलसीबी टीमचे कौतुक अन् बक्षीसही
केवळ चोवीस तासांत या खुनाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आल्याने पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी एलसीबी टीमचे काैतुक करून त्यांना बक्षीसही जाहीर केले.