Satara: बरड येथे भीषण अपघातात तीन ठार, गाडीचा चक्काचूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 13:51 IST2024-10-31T13:51:39+5:302024-10-31T13:51:58+5:30
ऐन दिवाळीत गावावर शोककळा

Satara: बरड येथे भीषण अपघातात तीन ठार, गाडीचा चक्काचूर
फलटण : पंढरपूर रस्त्यावर बरड ता. फलटण गावाच्या हद्दीत चार चाकी गाडीचा पहाटे तीन ते चार वाजण्याच्या दरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातात तिघा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, विजापूर (कर्नाटक) हुन पाडेगाव येथील भैरवनाथ ट्रक गॅरेजचे मालक सागर चौरे (वय ३४ रा. पाडेगाव ता खंडाळा) चालक निलेश शिर्के (रा. खटाव) व भाऊसो जमदाडे (रा खेड ता खंडाळा) हे तिघेजण चाकी क्रमांक एच ५३ ए ०५१४ मधून फलटण कडे येत होते.
पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास बरडहून अर्धा किलोमीटर पुढे आल्यानंतर अज्ञात वाहनाच्या धडकेत चार चाकी गाडीचा अपघात झाला. या अपघातामध्ये गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला. यामधील जखमींना स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढले व उपचारासाठी पाठवले परंतू तिघा प्रवाशांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
ऐन दिवाळीत गावावर शोककळा
ऐन दिवाळीच्या दिवशी तिघांच्याही मृत्यूमुळे पाडेगाव खटाव व खेड या गावावर शोककळा पसरली आहे. हा अपघात नेमका कसा झाला याबाबतचा तपास सुरू आहे. पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन वाहतूक सुरळीत केली. घटनेचा अधिक तपास सुरू आहे.