यंदा उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवणार नाही, सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणात किती पाणीसाठा.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 19:50 IST2025-02-25T19:48:32+5:302025-02-25T19:50:37+5:30

सातारा : जिल्ह्यात गेल्यावर्षी धुवाधार पाऊस झाल्याने यंदा धरणांत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा शिल्लक आहे. यामधील कोयना, धोम, तारळी, कण्हेर ...

There will be no problem of drinking water this summer This year in Satara district there is water storage in the dams | यंदा उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवणार नाही, सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणात किती पाणीसाठा.. जाणून घ्या

यंदा उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवणार नाही, सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणात किती पाणीसाठा.. जाणून घ्या

सातारा : जिल्ह्यात गेल्यावर्षी धुवाधार पाऊस झाल्याने यंदा धरणांत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा शिल्लक आहे. यामधील कोयना, धोम, तारळी, कण्हेर उरमोडीसह सहा प्रमुख धरणांत सुमारे १०८ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. कोयना धरणातही ७७ टीएमसीवर पाणी आहे. यामुळे यावर्षी सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवणार नाही, अशी स्थिती आहे.

जिल्ह्याच्या पश्चिम भागात कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी ही प्रमुख सहा धरणे आहेत. या धरणांची पाणीसाठवण क्षमता १४८ टीएमसीवर आहे. दरवर्षी पर्जन्यमान चांगले झाल्यास धरणे भरतात. त्यामुळे पुढील वर्षीच्या पावसाळ्यापर्यंत चिंता नसते. कारण, या धरणांवर पिण्याच्या आणि सिंचन पाण्याच्या योजना अवलंबून आहेत. त्यातच गेल्यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. वार्षिक सरासरीच्या १२५ टक्के पाऊस पडला होता. त्यामुळे ऑगस्ट-सप्टेंबरमध्येच मोठी धरणे भरून वाहत होती. त्यातच ऑक्टोबरमध्येही पाऊस झाल्याने जिल्ह्यातच सर्वत्र पाणी उपलब्ध झालेले. परिणामी यावर्षी अजूनही सिंचनासाठी पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली नाही. त्यामुळे धरणात पाणीसाठा चांगलाच शिल्लक आहे.

जिल्ह्यातील सर्वांत मोठे धरण कोयना आहे. या धरणाची पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. २०२३ मध्ये पर्जन्यमान कमी झाल्याने धरण भरले नव्हते. पण, गेल्यावर्षी धरण ओव्हरफ्लो झाले. या धरणात सध्या ७७.६४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. तसेच इतर बहुतांशी धरणांतही मागील वर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा असल्याचे दिसून येत आहे. यामुळे उन्हाळ्यातही पाणी कमी पडणार नाही, अशी स्थिती आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील इतर तालुक्यांतही छोटी-मोठी धरणे आहेत. या प्रकल्पातही पाणीसाठा चांगलाच शिल्लक आहे.

मागील वर्षी ८८ टीएमसीवर साठा..

जिल्ह्यात मागील वर्षी २४ फेब्रुवारीपर्यंत प्रमुख सहा धरणांत ८७.८९ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. यामध्ये उरमोडी आणि कण्हेर धरणांत केवळ ३९ टक्के साठा होता. तर कोयना धरणात ६३ टक्के, धोममध्ये ५८ टक्के साठा उपलब्ध होता.

कोयनेतून २,१०० क्युसेक विसर्ग..

जिल्ह्यातील प्रमुख धरणांतून सिंचन तसेच पिण्याच्या पाण्यासाठी विसर्ग सुरूच आहे. कोयना धरणात २ हजार १००, धोममधून १ हजार ३२५, कण्हेर धरणातून ४३५, बलकवडी ३४०, तारळीतून २२० आणि उरमोडी धरणातून ५०० क्युसेक विसर्ग सुरू आहे.

जिल्ह्यातील धरणांची स्थिती (टीएमसीमध्ये)

धरण  - सध्याचा साठा  - टक्केवारी  - एकूण क्षमता

कोयना  - ७७.६४  - ७२.४०  - १०५.२५
धोम - ९.०८  - ६३.९० - १३.५०
बलकवडी २.५३ - ६०.८० - ४.०८
कण्हेर ७.३५ - ७१.२८ - १०.१०
उरमोडी ७.७५  - ७७.१४  - ९.९६
तारळी ३.४६  - ५९.११ - ५.८५

Web Title: There will be no problem of drinking water this summer This year in Satara district there is water storage in the dams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.