सातारा जिल्ह्यावर वरुणराजाची वक्रदृष्टी; यंदा नवजा, कोयना, महाबळेश्वरमध्ये पावसाची किती झाली तूट.. वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 17:41 IST2025-08-14T17:41:25+5:302025-08-14T17:41:50+5:30
कोयनेत किती टीएमसी पाणीसाठा..

संग्रहित छाया
सातारा : जिल्ह्यात यंदा जून महिन्यात धुवाधार पाऊस झाल्यानंतर जुलै आणि आता ऑगस्ट महिन्यातही कमी पर्जन्यमान राहिले आहे. यामुळे गतवर्षीपेक्षा यंदा कमी पाऊस झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातच मागील वर्षीपेक्षा यंदा कोयना नगरला १ हजार १५८, नवजा येथे १ हजार ५४५ आणि महाबळेश्वरला १ हजार २२५ मिलीमीटर पावसाची तूट आहे. तर सध्या प्रमुख सहा धरणांत १२९ टीएमसी पाणीसाठा झालेला आहे.
जिल्ह्यात जून ते सप्टेंबर दरम्यान मान्सूनचा पाऊस पडतो. या चार महिन्यांतील जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ८८६ मिलीमीटर आहे. यावर्षी मे महिन्याच्या उत्तरार्धात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली. यामुळे तलाव, धरणात पाणीसाठा वाढला. तसेच ओढे, नद्या ही वाहू लागल्या. यानंतर जून महिन्यात मान्सूनचा पाऊस झाल्यानंतर अतिवृष्टी झाली. त्यामुळे जून महिन्यात १२५ टक्के पाऊस पडला.
मात्र, जुलै महिन्यात पावसाने सरासरी गाठली नाही. अवघा ८५ टक्केच पाऊस झाला. तर ऑगस्ट महिना सुरू झाल्यानंतर बहुतांशी भागात पावसाची उघडीपच आहे. पश्चिम भागात तुरळक प्रमाणात पाऊस होत आहे. तरीही यंदा गतवर्षीपेक्षा पर्जन्यमान कमी आहे.
पश्चिम भागातील कोयना, नवजा, महाबळेश्वर, कास, तापोळा हा भाग अतिवृष्टीचा. पण, येथेही पर्जन्यमान कमी आहे. नवजाला गतवर्षीपेक्षा तब्बल दीड हजार मिलीमीटर पावसाची तूट आहे. अशीच स्थिती कोयना आणि नवजा येथील पावसाची आहे. त्यामुळे पुढील दीड महिन्यात किती पाऊस होतो यावर या तीन ठिकाणचा पाऊस सरासरी गाठणार का हे स्पष्ट होणार आहे.
कोयनेत अडीच टीएमसी पाणीसाठा कमी..
कोयना धरण क्षेत्रात पाऊस सुरूच असला तरी प्रमाण कमी आहे. त्यातच मागील महिन्यात कोयना धरणातून पाणी विसर्ग मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता. यामुळे धरणात सध्या ८८.११ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. तर गतवर्षी १३ ऑगस्टला कोयनेत ९०.६७ टीएमसी साठा होता. गतवर्षीपेक्षा धरणात सुमारे अडीच टीएमसीहून कमी पाणीसाठा आहे.
पश्चिम भागातील पाऊस (मिलीमीटरमध्ये..)
ठिकाण - २०२४ - २०२५
कोयना - ३१२८ - ४२८६
नवजा - ३५४८ - ५०९३
महाबळेश्वर - ३६२० - ४८४५
धोम, कण्हेर, उरमोडी धरणाची भरण्याकडे वाटचाल..
जिल्ह्याच्या पश्चिम भागात प्रमुख सहा धरणे आहेत. याची एकूण पाणी साठवण क्षमता १४८.७४ टीएमसी आहे. सध्या १२८.९२ टीएमसी साठा झालेला आहे. यातील कोयना धरण सुमारे ८४ टक्के भरलेले आहे. तर धोम आणि बलकवडी ९४ टक्के, कण्हेर ९४.५५, उरमोडी ९५.६८ तर तारळी धरणात ८८.४ टक्के भरलेले आहे. यावरून धोम, कण्हेर, उरमोडी धरणाची पूर्ण भरण्याकडे वाटचाल सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.