99th Marathi Sahitya Sammelan: साहित्यिकांसाठी साताऱ्याची ओळख असणारे स्मृतिचिन्ह !
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 19:17 IST2026-01-02T19:16:17+5:302026-01-02T19:17:14+5:30
संमेलनाचे आणखी एक वैशिष्ट : पोवई नाक्यावरील शिवरायांची प्रतिकृती

99th Marathi Sahitya Sammelan: साहित्यिकांसाठी साताऱ्याची ओळख असणारे स्मृतिचिन्ह !
नितीन काळेल
सातारा : सातारा शहरातील ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे भव्यदिव्य तसेच वर्षानुवर्षे दखल घेण्यासारखे होणार असून, यामध्ये नवनवीन बाबी ही आहेत. त्याचबरोबर व्यासपीठावरील सर्व साहित्यिकांना सातारा शहराची ओळख असलेले पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिकृतीचे सन्मानचिन्ह दिले जाणार आहे. यामुळे हे आणखी एक संमेलनाचे वैशिष्ट ठरणार आहे.
सातारा शहरात गुरुवारपासून ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू झाले आहे. एकूण चार दिवस संमेलन सोहळा रंगणार आहे. रविवार, दि. ४ जानेवारी रोजी या संमेलनाचा समारोप होणार आहे. चार दिवसांच्या संमेलनात विविध कार्यक्रम होत आहेत. यामुळे रसिकांना मोठी पर्वणी मिळालेली आहे. त्याचबरोबर या संमेलनाच्या निमित्ताने मराठी साहित्य संमेलनाचे १० माजी अध्यक्ष साताऱ्यात चार दिवस थांबणार आहेत. तसेच निमंत्रित ही येणार आहेत. शेकडो साहित्यिक ही सहभागी होणार आहेत. यामध्ये व्यासपीठावरील सर्व साहित्यिकांना स्मृतिचिन्ह दिले जाणार आहे.
शहरातील पोवई नाक्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे. सातारा शहराची ही ओळख आहे. या प्रतिकृतीचे स्मृतिचिन्ह साहित्यिकांना भेट दिले जाणार आहे. यामुळे सातारा शहराची ही ओळख जगात ही पोहोचणार आहे. हेही या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे वैशिष्ट ठरणार आहे.
साताऱ्यातील सोहळा ऐतिहासिक ठरणार...
सातारा शहरातील साहित्य संमेलन ‘न भूतो, न भविष्यती’ ठरविण्याचा निश्चय आयोजकांनी पूर्वीपासून केलेला आहे. यामुळे या संमेलनाला व्यापक स्वरुप आलेले आहे. दररोज हजारोंच्या संख्येत रसिक तसेच सातारकर या संमेलनात सहभागी होणार आहेत. यामुळे संमेलनस्थळी साहित्याचाच जागर होणार आहे.