कोयता गँगची दहशत मोडली! साताऱ्यात गॅरेज मालकावर हल्ला करणाऱ्यांची पोलिसांनी काढली 'भरचौकात धिंड'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 15:52 IST2026-03-04T15:46:07+5:302026-03-04T15:52:51+5:30
काही दिवसांपूर्वी (२५ फेब्रुवारी २०२६), करंजे पेठ नाका येथील एका गॅरेजमध्ये शिरून ३ ते ४ संशयितांनी गॅरेज मालक अक्षय रामदास गाडे यांच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला होता.

कोयता गँगची दहशत मोडली! साताऱ्यात गॅरेज मालकावर हल्ला करणाऱ्यांची पोलिसांनी काढली 'भरचौकात धिंड'
सातारा येथील करंजे नाका आणि मोळाचा ओढा परिसरात भरदिवसा कोयत्याने थरार निर्माण करणाऱ्या गुंडांची शाहूपुरी पोलिसांनी आज पायी धिंड काढली. गॅरेज मालकावर जीवघेणा हल्ला करून पळ काढणाऱ्या सहा आरोपींना पोलिसांनी त्यांच्याच गुन्हेगारी क्षेत्रातून फिरवून त्यांचा 'वचक' संपवण्याचा प्रयत्न केला.
काही दिवसांपूर्वी करंजे पेठ नाका येथील एका गॅरेजमध्ये शिरून ३ ते ४ संशयितांनी गॅरेज मालकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला होता. वार चुकवल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्याने सातारा शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांची 'ॲक्शन' मोडमध्ये एन्ट्री
घटनेचे गांभीर्य ओळखून शाहूपुरी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि मुख्य सूत्रधारासह सहा आरोपींना बेड्या ठोकल्या. पोलिसांनी आज पायी धिंड मोळाचा ओढा, बुधवार नाका आणि करंजे नाका या परिसरातून सर्व आरोपींची पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात धिंड काढली.
ज्या भागात या आरोपींनी दहशत माजवली होती, त्याच भागात त्यांना पायी फिरवून पोलिसांनी 'कायद्यापेक्षा मोठे कोणीही नाही' असा संदेश दिला. कोयता हल्लेखोरांना अशा प्रकारे रस्त्यावरून फिरवताना पाहून परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, कोयता गँग किंवा इतर कोणत्याही टोळीची दहशत खपवून घेतली जाणार नाही.