माथाडींसाठीच्या संघर्षातून शशिकांत शिंदे यांचा राजकीय कारकिर्दीचा पाया 

By दीपक देशमुख | Updated: July 16, 2025 17:32 IST2025-07-16T17:31:32+5:302025-07-16T17:32:08+5:30

माथाडी कामगार नेते ते प्रदेशाध्यक्ष

The struggle for Mathadi laid the foundation for Shashikant Shinde's political career. | माथाडींसाठीच्या संघर्षातून शशिकांत शिंदे यांचा राजकीय कारकिर्दीचा पाया 

माथाडींसाठीच्या संघर्षातून शशिकांत शिंदे यांचा राजकीय कारकिर्दीचा पाया 

दीपक देशमुख

सातारा : मुंबईत माथाडी कामगारांच्या न्याय-हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या लढवय्ये तरुण नेतृत्व शशिकांत शिंदे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पारख्या नजरेने हेरले. १९९९ मध्ये विधानसभेला जावळीच्या मैदानात उतरवले. हा विश्वास सार्थ करत शिंदे यांनी शिवसेनेचे आमदार सदाशिव सपकाळ यांचा पराभव करत राजकीय मुहूर्तमेढ रोवली. यानंतर अनेक विजय अन् अपयश पचवून संकट काळातही पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या शिंदे यांचा प्रवास माथाडी कामगार नेते ते पक्षाचे प्रदेशाध्यक्षपदापर्यंत झाला आहे.

आमदार शशिकांत शिंदे यांनी १९९९ मध्ये निवडून आल्यानंतर जावळी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना मुंबई येथील बाजार समितीवरील आपली पकड घट्ट केली. जावळी विधानसभेतून सलग दोन वेळा ते निवडून आले. विधानसभा निवडणुकीच्या पुनर्रचनेत जावळी मतदारसंघ रद्द झाल्यानंतर त्यांनी कोरेगाव मतदारसंघातून २००९ मध्ये निवडणूक लढवली व मोठ्या मताधिक्याने निवडून गेले.

२००९ मध्ये राष्ट्रवादीच्या पक्षप्रतोदपदी, तर २०१२ पक्षाच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी पार पडली. २०१३ राज्याच्या जलसंपदा मंत्रिपदी त्यांची निवड झाली. तसेच सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचीही धुरा त्यांच्याकडे आली. यानंतर २०१४ च्या निवडणुकीत पुन्हा कोरेगाव मतदारसंघातून ते निवडून गेले. यावेळी राष्ट्रवादीच्या पक्षप्रतोदपदीही फेरनिवड झाली.
२०१५ ते सातारा व सांगली जिल्ह्यांचे संपर्कप्रमुख झाले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांच्या काळात पक्षसंघटन वाढवण्यासाठी मोलाचे योगदान दिले. २०१९मध्ये निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. या काळात अनेक नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपाची वाट पकडली; परंतु शशिकांत शिंदे हे पक्षाशी एकनिष्ठ राहिले.

निष्ठेचे फळ ..

विधान परिषदेच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडली. २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीला त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात दिलेल्या लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. त्यांचा निसटता पराभव झाला. मात्र, पक्ष संकटात असतानाही त्यांनी शरद पवार आणि पक्षाशी आपली निष्ठा ठेवली. पक्षासाठी स्वत:चे राजकीय अस्तित्व पणाला लावणाऱ्या या लढवय्या नेत्यावर अखेर पक्षाचे राज्यात संघटन करण्याची जबाबदारी शरद पवार यांनी साेपवली आहे.

Web Title: The struggle for Mathadi laid the foundation for Shashikant Shinde's political career.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.