Satara Crime: दरोडेखोरांनी दरवाजावर लाथा मारल्या अन् तिने आतून दरवाजा ताकदीनिशी धरला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 15:04 IST2025-12-24T15:03:50+5:302025-12-24T15:04:14+5:30
पानस येथे रात्री सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न; मुलीने हातात फोन घेतला अन् दरोडेखोर पळाले

Satara Crime: दरोडेखोरांनी दरवाजावर लाथा मारल्या अन् तिने आतून दरवाजा ताकदीनिशी धरला!
सातारा : सात ते आठ सशस्त्र दरोडेखोर हातात गज, कोयते, चाकू घेऊन दरवाजावर लाथा मारत होते तर आतून महिलेने दरवाजा ताकदीनिशी धरून ठेवला. यामुळे चिडलेल्या दरोडेखोरांनी महिलेवर चाकूने वार केला. हा दरोड्याचा धक्कादायक प्रकार जावळी तालुक्यातील कुडाळ परिसरात सोमवारी रात्री बाराच्या सुमारास पुनर्वसित पानस या गावात घडला.
कुडाळजवळ पुनर्वसित पानस गाव आहे. या गावात सोमवारी रात्री सुमारे बाराच्या सुमारास दरोडेखोरांनी प्रवेश केला. कुडाळचे उपसरपंच सोमनाथ कदम यांच्या शेतातील घराचा कडीकाेयंडा तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर चोरट्यांनी जवळच असलेल्या तानाजी विठ्ठल कदम यांच्या घराकडे मोर्चा वळवला. घरात तानाजी कदम, त्यांची पत्नी धनश्री आणि मुलगी होती. दरोडेखोरांनी दरवाजाला लाथा मारून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न सुरू केला. यावेळी धनश्री कदम यांनी आतून दरवाजा ताकदीनिशी धरून ठेवला. जेणेकरून दरोडेखोर आत येऊ नयेत, यासाठी त्यांची धडपड सुरू होती.
काहीवेळानंतर दरवाजा कोसळण्याच्या बेतात असतानाच तानाजी कदम यांच्या पत्नीने तो रोखण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, तानाजी कदम यांनी दरोडेखोरांना प्रतिकार करण्यासाठी हातात फावडे घेतले. हे पाहून दरोडेखोरांनी थेट त्यांच्या पत्नीवर हल्ला चढवत हातावर चाकूने वार केला.
याचवेळी तानाजी कदम यांच्या मुलीने शेजाऱ्यांना फोन करून मदतीसाठी बोलावल्याचे दरोडेखोरांच्या लक्षात येताच त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच मेढा पोलिस ठाण्याच्या गस्ती पथकाने घटनास्थळी भेट दिली.