Satara-Local Body Election: विरोधकाला मत देईन; पण..; उमेदवारांमधील जुन्या वादांचे सावट पुन्हा गडद
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 17:36 IST2025-11-27T17:33:36+5:302025-11-27T17:36:06+5:30
नाराजीचा परिणाम निवडणूक समीकरणांवर

Satara-Local Body Election: विरोधकाला मत देईन; पण..; उमेदवारांमधील जुन्या वादांचे सावट पुन्हा गडद
दत्ता यादव
सातारा : सातारा पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांमधील जुन्या वादांचे सावट पुन्हा गडद होताना दिसत आहे. पूर्वी किरकोळ कारणांवरून झालेल्या भांडणांचा, कार्यकर्त्यांच्या पळवापळवीचा, कामाचे श्रेय घेण्याच्या स्पर्धेचा आणि निधी वाटपावरून निर्माण झालेल्या नाराजीचा परिणाम आता सरळ निवडणूक समीकरणांवर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या निवडणुकीत सातारा विकास आघाडी आणि नगरविकास आघाडीमध्ये मनोमिलन झाल्याने चुरस कमी होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, आघाडीतल्या काही माजी नगरसेवकांमधील पूर्वीचे वाद पूर्णपणे मिटले नसल्याचे आता उघड होत आहे. पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचलेले वाद, एकमेकांविरुद्ध दाखल झालेल्या तक्रारी आणि त्या काळात निर्माण झालेला राग अद्यापही कायम असल्याचे पक्षांतर्गत हालचालींवरून जाणवू लागले आहे.
वरिष्ठ नेते एकजूट दाखवत असले तरी तळागाळातील मतफोडीची हालचाल सुरू झाली असून त्याची झळ थेट उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे. याचदरम्यान, एका माजी नगरसेवकाच्या कुटुंबातील सदस्याकडून सत्ताधारी नगरसेवकाला ‘तीन डिसेंबरला पाणी पाजणार’ असा उल्लेख असलेला मेसेज सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या संदेशामुळे आघाडीत पाडापाडीचे राजकारण जोर धरण्याची चिन्हे अधिक स्पष्ट झाली आहेत.
जुने वाद विसरून निवडणुकीला सामोरं जाण्याचे आवाहन पक्षनेते करीत असले तरी अंतर्गत कलह थांबलेला नाही. त्यामुळे या निवडणुकीत अधिकृत आघाडीपेक्षा अंतर्गत मतफोडीचे राजकारणच निर्णायक ठरण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. अशी परिस्थिती कायम राहिली, तर निवडणुकीचा कल अगदी अनपेक्षित दिशेने वळण्याचा अंदाजही वर्तवला जात आहे.
प्रभाग रचनेमुळे वाॅर्डाची अदलाबदल
निवडणुकीपूर्वी प्रभाग रचनेमध्ये अदलाबदल झाली. त्यामुळे अनेक वर्षे एकाच वाॅर्डमध्ये आपले बस्तान बसविलेल्या प्रस्थापित नगरसेवकांना दुसऱ्या वाॅर्डात जाऊन आपल्या पारड्यात मत मिळविणे फार जिकिरीचे ठरणार आहे. त्यातच कधी काळी विरोधकांसोबत झालेल्या वादाचाही आघाडीतील काही उमेदवारांना फटका बसण्याची शक्यता आहे.
विरोधकाला मत देईन; पण ‘त्याला’ नाही
जुन्या किरकोळ वादामुळे निवडणुकीत पाडापाडीचे राजकारण सुरू आहे. आपला पूर्वीचा मित्र व सध्याच्या दुश्मनाला कोणत्याही परिस्थितीत मत द्यायचे नाही. असं म्हणे अनेकांनी ठरलंय. एकवेळ विरोधकाला मत देईन पण त्याला (दुश्मनाला) देणार नाही, असा निश्चय अनेकांनी केला असल्याचे बोलले जात आहे.