Ashadhi Wari 2026: यंदा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीचे सातारा जिल्ह्यात चार मुक्काम!; नीरा स्नान कधी, गोल-उभे रिंगण किती..वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 14:06 IST2026-03-30T14:06:08+5:302026-03-30T14:06:43+5:30
Sant Dnyaneshwar Maharaj Mauli Palkhi 2026 Schedule: आषाढी वारी २०२६: संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर

संग्रहित छाया
Pandharpur Wari 2026 Timetable: आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा दि. ८ जुलैला पंढरपूरला प्रस्थान ठेवणार आहे तसेच २४ जुलैला पालखी सोहळा पंढरपूरला पोहोचणार आहे. सातारा जिल्ह्यात यंदा पालखीचे चार मुक्काम असणार आहेत. १५ जुलैला सोहळा नीरा नदीकाठी पोहोचणार असून, या ठिकाणी सातारा जिल्ह्यात प्रवेश होईल. १६ जुलै तरडगाव, १७ जुलै फलटण तर १८ जुलैला बरडला सोहळा मुक्कामी असणार आहे.
यंदा दुपारी तीन वाजता प्रस्थान होणार आहे. १७ दिवस मुक्काम, ४ गोल तर ३ उभे रिंगण होणार असल्याची माहिती पालखी सोहळाप्रमुख राजेंद्र उमाप यांनी दिली. आषाढी एकादशी २५ जुलैला साजरी होणार आहे. पंढरपूर येथील संत ज्ञानेश्वर महाराज मठात आळंदी संस्थानची बैठक पार पडली. त्यामध्ये उमाप यांनी पालखी सोहळ्याचा कार्यक्रम जाहीर केला.
आळंदी ते पंढरपूर प्रवास: रिंगण सोहळा आणि मुक्कामाची ठिकाणे
ज्येष्ठ वद्य अष्टमी अर्थात बुधवारी (८ जुलै) आळंदी येथून प्रस्थान, ९ व १० जुलैला पुण्यात मुक्काम, ११ व १२ जुलै सासवड मुक्काम, १३ जुलैला जेजुरी, १४ जुलैला वाल्हे मुक्कामी राहणार आहे. १५ जुलैला नीरा स्नान करून पालखी लोणंद येथे मुक्कामी. पुढे १६ जुलैला लोणंद येथून पुढे दुपारी पालखी चांदोबाचा लिंब येथे सोहळ्यातील पहिले उभे रिंगण होऊन पालखी तरडगाव येथे मुक्कामी येणार आहे. १७ जुलैला फलटण, तर १८ जुलैला बरड येथे पालखी विसावणार आहे. १९ जुलैला सोलापूर जिल्ह्यात प्रस्थान करणार आहे.
- २३ जुलैला बाजीराव विहीर येथे गोल आणि उभे रिंगण होऊन पालखी वाखरी येथे विसावणार आहे.
- २४ जुलैला आषाढ दशमीला दुपारी उभे रिंगण होऊन सर्व संतांच्या पालखी पंढरपूर येथे मुक्कामी राहणार आहेत.
- २५ जुलैला आषाढी एकादशी सोहळा होणार आहे.