माऊलींची वारी.. स्वागताला सजली लोणंदनगरी !, आज नीरा स्नान; वैष्णवांचा मेळा सातारा जिल्ह्यात चार दिवस मुक्कामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 11:58 IST2025-06-26T11:57:51+5:302025-06-26T11:58:40+5:30

भक्तीच्या या अगाध सोहळ्यासाठी अवघी लोणंदनगरी आतुरली

The palanquin ceremony of Sant Shrestha Dnyaneshwar Mauli, which was heading towards Pandhari reached Satara district on Thursday | माऊलींची वारी.. स्वागताला सजली लोणंदनगरी !, आज नीरा स्नान; वैष्णवांचा मेळा सातारा जिल्ह्यात चार दिवस मुक्कामी

माऊलींची वारी.. स्वागताला सजली लोणंदनगरी !, आज नीरा स्नान; वैष्णवांचा मेळा सातारा जिल्ह्यात चार दिवस मुक्कामी

सातारा : विठूरायाच्या भेटीची आस मनात घेऊन पंढरीच्या दिशेने निघालेला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा गुरुवारी (दि. २६) सातारा जिल्ह्यात दाखल होत आहे. भक्तीच्या या अगाध सोहळ्यासाठी अवघी लोणंदनगरी आतुरली असून, जिल्हा प्रशासनदेखील माऊलींच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे.

ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याला परंपरेची किनार आहे. दरवर्षी लाखो वारकरी या सोहळ्यात नि:स्वार्थ भावनेने सहभागी होऊन पंढरीच्या दिशेने चालत असतात. वैष्णवांचा हा मेळा गुरुवारी महर्षी वाल्मिकी यांच्या वाल्हे नगरीचा निरोप घेऊन साताऱ्यात दाखल होणार आहे. लोणंद, तरडगाव, फलटण, बरड असा विसावा घेत हा सोहळा दि. ३० जुलैला सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.

पालखी सोहळ्याचा वारीतील पहिला मुक्काम लोणंदनगरीत असल्याने माऊलींच्या स्वागतासाठी लोणंदनगरी सज्ज झाली असून, प्रशासनाकडूनही स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. पालखी सोहळ्याचे गमन व स्वागत करण्यासाठी मौजे पाडेगाव येथे स्वागत मंडप उभारण्यात आला आहे. तसेच पालखी विसावा, पालखी तळाची स्वच्छता करण्यात आली आहे.

पालखी मार्गाची डागडुजी करून वारकऱ्यांची वाट सुकर करण्यात आली आहे. ठिकठिकाणी फिरते स्वच्छतागृह, पाणी, वीज, आरोग्य अशा पायाभूत सेवांची पूर्तता करण्यात आली आहे. वारकरी व भाविकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासनासह पोलिस दलाची यंत्रणा सज्ज झाली आहे.

पालखी सोहळ्याचा कार्यक्रम असा

  • गुरुवारी (दि. २६) माऊलींचा पालखी सोहळा लोणंदनगरीत विसावणार आहे.
  • शुक्रवारी (दि. २७) दुपारचा विसावा चांदोबाचा लिंब येथे होईल तर मुक्काम तरडगाव येथे होईल.
  • शनिवारी (दि. २८) काळज, निंभोरे, वडजल असा पाहुणचार घेत हा सोहळा फलटण विमानतळावर विसावा घेईल.
  • रविवारी (दि. २९) सकाळी विडणी, पिंपरद, निंबळक फाटा करत पुढे बरड येथे मुक्कामी जाईल.
  • सोमवारी (दि. ३०) वैष्णवांचा मेळा सातारा जिल्ह्याचा निरोप घेऊन सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेल.


सीसीटीव्ही अन् डिजिटल स्क्रीन

लोणंद नगर पंचायतीकडून पालखी सोहळ्यासाठी ठिकठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच वारीतील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. ज्या भाविकांना माऊलींच्या पालखीचे, पादुकांचे दर्शन घेता येणार नाही, अशा भाविकांना पादुकांचे ऑनलाइन दर्शन घेता यावे, यासाठी तीन ठिकाणी डिजिटल स्क्रीन बसविण्यात आली आहे.

जिल्हा प्रशासनाची यंत्रणा सज्ज

पालखी सोहळा निर्विघ्न पार पाडण्यासाठी महसूल विभाग, स्वच्छता विभाग, पाणीपुरवठा विभाग, आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामकाजाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या सोहळ्यासाठी मुक्कामाच्या चारही ठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात असणार आहे.

Web Title: The palanquin ceremony of Sant Shrestha Dnyaneshwar Mauli, which was heading towards Pandhari reached Satara district on Thursday