Satara: कोयना धरणाच्या प्रवेशद्वारावरील नामफलक बदलला, श्री छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर असे केले नामकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 16:59 IST2026-01-09T16:58:06+5:302026-01-09T16:59:25+5:30
गेल्या दहा वर्षांपासून नामकरणासाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश

Satara: कोयना धरणाच्या प्रवेशद्वारावरील नामफलक बदलला, श्री छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर असे केले नामकरण
कोयनानगर : कोयना धरणाच्या प्रवेशद्वारावरील नामफलक बदलून ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ असे नामकरण करण्यात आले आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे कोयना परिसरासह पाटण तालुक्यात समाधान व अभिमानाची भावना व्यक्त होत आहे. गेल्या दहा वर्षांपासून या नामकरणासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात होता. त्या प्रयत्नांना अखेर यश मिळाल्याची भावना भाजपा पाटण तालुकाध्यक्ष नंदकुमार सुर्वे यांनी व्यक्त केली.
सुर्वे म्हणाले, ‘कोयना धरणाचे ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ असे नामकरण करण्यात यावे. या मागणीची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी गांभीर्याने घेत सविस्तर अहवाल मागविला. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मागणीनुसार दि. १६ एप्रिल २०२५ रोजी मंत्रालयात जलसंपदा विभागाची बैठक आयोजित करण्यात आली. त्यानंतर २३ डिसेंबर २०२५ रोजी प्रत्यक्ष भेटीनंतर २६ डिसेंबर २०२५ रोजी जलसंपदा मंत्र्यांनी जलसंपदा महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना धरणाच्या नावात तातडीने बदल करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार कोयना धरणाचे अधिकृत नाव ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ असे करण्यात आले.
या संपूर्ण प्रक्रियेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. डॉ. अतुल भोसले, आ. मनोज घोरपडे, माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, भाजपा नेते सत्यजितसिंह पाटणकर, याज्ञसेन पाटणकर, विक्रमबाबा पाटणकर, राजाभाऊ शेलार यांच्यासह जलसंपदा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे सुर्वे यांनी नमूद केले.