Satara Politics: रात्रीच्या गाठीभेटी, ‘उदयनराजेंनी' मारली ‘राजेंद्रसिंह’ यांना मिठी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 19:28 IST2026-01-01T19:27:23+5:302026-01-01T19:28:01+5:30
भाजप उमेदवाराचा पराभव करणाऱ्या यादवांची उदयनराजेंनी घेतलेली भेट चर्चेत

Satara Politics: रात्रीच्या गाठीभेटी, ‘उदयनराजेंनी' मारली ‘राजेंद्रसिंह’ यांना मिठी!
प्रमोद सुकरे
कराड : भाजपचे नेते खासदार उदयनराजे भोसले व कराडचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांची मैत्री सर्वश्रुत आहे; पण कराड पालिकेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदेसेना आघाडी असा सामना झाला. त्यामुळे खासदार उदयनराजे या निवडणुकीपासून दूरच दिसत होते; पण निवडणुकीत बाजीगर ठरलेल्या आपल्या मित्राला भेटायला उदयनराजे मंगळवारी रात्री उशिरा खास कराडला आले. त्यांनी राजेंद्रसिंह यादव यांना कडकडून मिठी मारली त्यामुळे ‘कमाल झाली, धमाल झाली, रात्रीच्या गाठीभेटी ‘उदयनराजें’नी मारली मिठी' असं गाणं राजेंद्रसिंह यादवांचे कार्यकर्ते गुणगुणू लागले आहेत.
खरंतर सातारा बरोबरच कराड नगरपालिकेची निवडणूकही नुकतीच झाली. यात भाजपचे जिल्हाध्यक्ष व कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले यांनी पक्ष चिन्हावर भाजपचे स्वतंत्र पॅनेल उभे केले होते. तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील नगराध्यक्ष पदासह इतर उमेदवार काँग्रेसच्या चिन्हावर रिंगणात उतरवले होते. मात्र शिंदेसेनेचे नेते राजेंद्रसिंह यादव यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांना सोबत घेत आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. त्यात ते यशस्वी ठरल्याचे आता निकालानंतर स्पष्ट झाले आहे.
मात्र राजेंद्रसिंह यादव यांचे नेते व मित्र असणारे खासदार उदयनराजे भोसले कराडच्या निवडणुकीपासून बरेच दूर राहिले होते. आता निकालानंतर मंगळवारी रात्री उशिरा कराडमधील एका हॉटेलमध्ये या दोघांची भेट झाली. त्यावेळी उदयनराजेंनी गाडीतून उतरल्या उतरल्या राजेंद्रसिंह यादव यांना मिठी मारली व त्यांचे अभिनंदन केले. त्याचवेळी नगरसेवक म्हणून निवडून आलेले त्यांचे बंधू विजयसिंह यादव यांना देखील त्यांनी जवळ घेत त्यांचे अभिनंदन केले. समाज माध्यमातून हे फोटो व्हायरल झाल्यानंतर याची बुधवारी दिवसभर शहरात जोरदार चर्चा सुरू होती.
पार्टी पाहिजे पार्टी
उदयनराजे भोसले यांनी राजेंद्रसिंह यादव व विजयसिंह यादव यांचे अभिनंदन तर केले. पण त्यावेळी ‘राजा या विजयाची पार्टी पाहिजे पार्टी’ अशी मिश्किल टिप्पणीही केली. त्यावर यादव बंधूंनीही नक्की असे सांगितले. आता बघूया ही पार्टी नेमकी कधी, कोठे अन् कशी होतेय आणि त्या पार्टीला नेमकं कोण कोण उपस्थित राहतंय ते.