“येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष, भंडाऱ्याची उधळण; लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला खंडोबा-म्हाळसा विवाह सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 18:36 IST2026-01-02T18:35:09+5:302026-01-02T18:36:21+5:30
पाल नगरी झाली सोनेरी

“येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष, भंडाऱ्याची उधळण; लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला खंडोबा-म्हाळसा विवाह सोहळा
अजय जाधव
उंब्रज: “येळकोट येळकोट जय मल्हार”च्या जयघोष, भंडाऱ्याची उधळण अन् लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्री. खंडोबा म्हाळसा याचा अनोखा विवाह सोहळा संपन्न झाला. संपूर्ण पालनगरी सोन्याची नगरी झाल्याचे चित्र दिसून आले. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश राज्यातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या खंडोबा व म्हाळसा विवाह सोहळयासाठी लाखो वऱ्हाडी भाविक पाल येथे दाखल झाले होते.
परंपरेनुसार दुपारी एक वाजण्याच्या सुमारास देवस्थान ट्रस्टने बनवलेल्या सागवानी रथातून मिरवणुकीची सुरुवात प्रमुख मानकरी देवराज पाटील यांच्या वाड्यापासून झाली. फुले, तोरणे यांनी सजवलेल्या बैलगाड्यांतून खंडोबाची व-हाडी मंडळी तारळी नदीच्या तीरावर जाण्यासाठी निघाली प्रत्येक व-हाडी मंडळीच्या पूढे वाद्धयवृंद वाजवत ही मंडळी यळकोट यळकोट जय मल्हार, सदानंदचा यळकोट असा गजर करत होते.
ही शाही मिरवणूक तारळी नदी ओलांडून विवाह मंडपात (बोहल्यावर) पोचली. नंतर व-हाडी मंडळीचा मानपानाचा विधी उरकण्यात आला. गोरज मुहर्तावर श्री खंडोबा व म्हाळसा विवाह सोहळा पार पडला. यावेळी भंडाऱ्याच्या उधळणीमुळे पाल नगरी सोनेरी झाल्याचे चित्र दिसून येत होते.
रात्री पासून या विवाह सोहळयाला वऱ्हाडी भाविक पालमध्ये दाखल झाले होते. भाविकांना खंडोबा व म्हाळसा यांच्या मुखवट्याचे देवळात व्यवस्थीत दर्शन व्हावे यासाठी देवस्थान ट्रस्टने दर्शनबारीची खास सोय केली होती. यात्रेकरुसांठी स्वच्छ पाणी, स्वच्छतागृहे, आदी सोयी उपलब्ध करण्यात आल्या होत्या. यात्रेसाठी येणा-या भाविकांसाठी उंब्रज,सातारा, कराड, पाटण येथून एस.टी.महामंडळाने जादा बसची सोय केली होती.
पोलिस प्रशासनाने आत्पकालीन जलद कृती दल, जमाव नियंत्रण पथक तैनात करण्यात आली होती. याशिवाय आपत्कालीन दक्षता म्हणून जिल्हा प्रशासनाचे आपत्कालीन पथक, अग्निशामकदलाची पथके, आरोग्यविभाग पथके, रुग्णवाहीका, सज्ज ठेवण्यात आली होती. तर आत्पकालीन उपयोगासाठी पाल-वडगांव-इंदोली मार्ग पुर्णता मोकळा ठेवण्यात आला होता. यात्रा कालावधीत अनुचित प्रकार घडू नये म्हनून पोलिस यंत्रणेने चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. यात्रा कालावधीत कायदासुव्यवस्था ठेवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा, देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत, यात्रा कमेटी, यांनी यात्रेची तयारी महिन्यापासून केली होती.