Satara: किल्ले अजिंक्यताऱ्यावर अवतरला शाहू काल, पारंपरिक वाद्यांच्या गजरात पालखी सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 13:59 IST2026-01-13T13:59:13+5:302026-01-13T13:59:28+5:30
ढोल-ताशांचा कडकडाट, सनईचे मंजूळ स्वर आणि तुतारीच्या ललकारीने आसमंत भारावून गेला

Satara: किल्ले अजिंक्यताऱ्यावर अवतरला शाहू काल, पारंपरिक वाद्यांच्या गजरात पालखी सोहळा
सातारा : सातारा नगरीचे निर्माते छत्रपती शाहू महाराज (थोरले) यांच्या राज्याभिषेकाचा सुवर्ण इतिहास सोमवारी किल्ले अजिंक्यताऱ्यावर पुन्हा एकदा जिवंत झाला. ढोल-ताशांचा कडकडाट, सनईचे मंजूळ स्वर आणि तुतारीच्या ललकारीने आसमंत भारावून गेला. निमित्त होते सातारा स्वाभिमान दिनाचे. शिवराज्याभिषेक समितीच्या वतीने आयोजित या १५व्या सोहळ्याने गडावर शाहू काल अवतरल्याची प्रचिती आली.
किल्ले अजिंक्यताऱ्यावर सोमवारी (दि. १२) छत्रपती शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. त्यामुळे हा दिवस स्वाभिमान दिन म्हणून साजरा केला जात आहे. या दिनाचे औचित्य साधून सोमवारी सकाळी गडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. गडाचे मुख्य महाद्वार आणि बुरुजांना फुलांची नयनरम्य सजावट करण्यात आली होती. सकाळी ८ वाजता शाहू महाराजांच्या मूर्तीची फुलांनी सजवलेल्या पालखीतून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
चामर आणि अबदागिरीच्या लव्याजम्यात निघालेल्या या पालखी सोहळ्यावर शिवभक्तांनी फुलांचा वर्षाव केला. राजसदरेवर हा सोहळा पोहोचल्यानंतर शिवभक्तांचा शिगेला पोहोचला. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलिस अधीक्षक तुषार दोशी, दीपक प्रभावळकर ज्यांच्यासह हजारो शिवभक्त सोहळ्याला उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले.
..अशी ही सामाजिक बांधिलकी..
छत्रपती शाहू महाराजांच्या सर्वसमावेशक धोरणांचा वारसा या सोहळ्यातही जपण्यात आला. औरंगजेबाची कन्या झिनतउन्नीसा यांनी महाराजांना कैदेत असताना मातृवत प्रेम दिले होते, त्यांच्या स्मरणार्थ शाहूनगरीत मशीद उभारण्यात आली होती. या इतिहासाची स्मृती म्हणून पालखी सोहळ्यात मुस्लिम बांधवांना विशेष मान देण्यात आला. तसेच, मंगळाई देवीच्या मंदिरात महिलांनी स्वतःच्या खांद्यावर पालखी घेऊन गडाच्या परंपरेला नवा आयाम दिला.
पारंपरिक वाद्यांचा गजर
किल्ल्यावरील रत्नेश्वर मंदिर आणि मंगळाई मंदिरात विधिवत पूजन करण्यात आले. गुरुकुल स्कूलच्या एनसीसी कॅडेट्सनी महाराजांच्या पालखीला मानवंदना दिली. सनई-चौघड्यांच्या निनादात आणि भगव्या ध्वजांच्या सावलीत हजारो सातारकरांनी हा स्वाभिमान सोहळा याची देही याची डोळा अनुभवला. सोहळ्यानंतर गडावर वृक्षारोपण करून पर्यावरणाचा संदेशही देण्यात आला.