सातारा जिल्ह्यात पावसाची उघडीप, कोयनेचे दरवाजे बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 13:21 IST2025-08-23T13:20:54+5:302025-08-23T13:21:16+5:30
यंदा प्रथमच सहा दरवाजातून विसर्ग

सातारा जिल्ह्यात पावसाची उघडीप, कोयनेचे दरवाजे बंद
सातारा : जिल्ह्यात पावसाची उघडीप असून, दिवसभरात कोयना येथे ४, तर महाबळेश्वरला अवघा २ मिलिमीटर पाऊस पडला. तसेच प्रमुख धरण क्षेत्रांतही पावसाची विश्रांती असल्याने विसर्गात घट झाली आहे, तर रात्री आठ वाजता कोयना धरणाचे सर्व सहा दरवाजे पूर्णपणे बंद करण्यात आले. पायथा वीजगृहातूनच विसर्ग सुरू होता, तर सायंकाळी धरणात ९९ टीएमसी पाणीसाठा झाला होता.
जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस झाला आहे. मात्र, बुधवारपासून पावसाचा जोर कमी होत गेला. शुक्रवारी तर दिवसभर पावसाची उघडीप होती. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे २४, नवजा २५ आणि महाबळेश्वरला २० मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. पण, सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत कोयना ४, नवजा ७ आणि महाबळेश्वरला २ मिलिमीटर पाऊस पडला. त्यातच कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाची उघडीप होती. त्यामुळे पाण्याची आवक कमी झाली आहे.
सायंकाळी २१ हजार क्यूसेक वेगाने धरणात पाणी येत होते, तर धरणात ९८.८९ टीएमसी पाणीसाठा झाला होता. धरण भरण्यासाठी अजूनही सहा टीएमसीहून अधिक पाण्याची गरज आहे. त्यामुळे रात्री ८ वाजता धरणाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले. फक्त पायथा वीजगृहातूनच २ हजार १०० क्यूसेक विसर्ग सुरूच आहे. त्याचबरोबर धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी या मोठ्या धरणातील विसर्गही कमी करण्यात आला आहे.
यंदा प्रथमच सहा दरवाजातून विसर्ग
जिल्ह्यात यावर्षी जून महिन्यात दमदार पाऊस झाला. त्यानंतर जुलैतही चांगले पर्जन्यमान झाले. कोयना धरण क्षेत्रातही अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात १५ जुलैला प्रथम धरणाचे सर्व सहा वक्र दरवाजे उघडून विसर्ग सुरू करण्यात आला. त्यानंतर एक ऑगस्टला दरवाजे बंद झाले. मात्र, दि. १५ ऑगस्टपासून पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी १७ ऑगस्टला दुसऱ्यांदा कोयनेचे दरवाजे उघडले. तसेच १३ फुटांपर्यंतवर दरवाजे घेऊन पाणी सोडण्यात आले. सध्या पाऊसच नसल्याने धरण भरण्यासाठी दुसऱ्यांदा कोयनेचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत.