Satara: नीरा नदीपात्रात वाहून गेलेल्या युवतीचा मृतदेह तिसऱ्या दिवशी सापडला, मित्रास चौकशीसाठी घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 19:07 IST2023-04-05T19:05:59+5:302023-04-05T19:07:46+5:30
तिसऱ्या दिवशी मृतदेह लागला हाती

Satara: नीरा नदीपात्रात वाहून गेलेल्या युवतीचा मृतदेह तिसऱ्या दिवशी सापडला, मित्रास चौकशीसाठी घेतले ताब्यात
मुराद पटेल
शिरवळ : हरतळी ता. खंडाळा गावच्या हद्दीत नीरा नदीच्या पाञात वरुड येथील वाहून गेलेल्या युवतीचा मृतदेह नदीपाञात तिसऱ्या दिवशी सापडला. तेजल उर्फ तेजू आप्पासो साळूंखे (वय 23, रा.वरुड ता.खटाव जि.सातारा सध्या रा.भोर जि.पुणे) असे मृत युवतीचे नाव आहे. महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड रेस्क्यू टिम व शिरवळ रेस्क्यू टिम यांच्या सहकार्याने शिरवळ पोलिसांकडून शोधमोहिम सूरु होती. अखेर तिसऱ्या दिवशी रेस्क्यू टिमला मृतदेह शोधण्यात यश आले. दरम्यान, पोलिसांनी मिञ दिंगबर साळेकर याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
याबाबत माहिती अशी की, पुणे व सातारा जिल्ह्यांच्या सीमेवरील वेलवंडी नदी व नीरा नदीच्या संगमावर भाटघर धरण आहे. धनगरवाडी हद्दीत असणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये काम करणारी तेजल साळुंखे ही कंपनीतील मित्र दिगंबर साळेकर (रा. निगुडघर, ता. भोर, जि. पुणे) याच्यासमवेत सोमवारी (दि.३) फिरण्यासाठी आली होती. यावेळी नीरा नदीच्या पात्रात असणाऱ्या पाॅवर हाऊसमधून १६३४ क्युसेक पाणी सोडण्यात आले होते. एका पुलाजवळ नदीपात्रात तेजल साळुंखे ही हात-पाय धुण्यासाठी उतरली. त्यावेळी पाय घसरून पाण्यात पडल्याने ती वाहून गेली होती.
महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड रेस्क्यू टीम, शिरवळ रेस्क्यू टीमकडून मृतदेहाची शोधमोहीम सुरू होती. अखेर तेजलचा मृतदेह शोधण्यात रेस्क्यू टीमला यश आले. हरतळी गावच्या हद्दीमध्ये स्मशानभूमीजवळ तेजलचा मृतदेह आढळून आला. यावेळी घटनास्थळी अपर पोलिस अधिक्षक बापू बांगर, फलटण पोलिस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे, शिरवळ पोलिस उपनिरीक्षक वृषाली देसाई यांनी भेट देऊन पाहणी केली. सातारा येथील शासकीय रुग्णालयात मृतदेहावर शवविच्छेदन करुन नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक वृषाली देसाई करीत आहेत.