Local Body Election-झटपट पटापट, इनकमिंग अंगलट !; कराड-मलकापुरात भाजपला फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 19:09 IST2025-12-24T19:05:20+5:302025-12-24T19:09:08+5:30
आत्मचिंतन करायला लागणार

Local Body Election-झटपट पटापट, इनकमिंग अंगलट !; कराड-मलकापुरात भाजपला फटका
प्रमोद सुकरे
कराड : भाजपचे जिल्हा अध्यक्ष व आमदार डॉ. अतुल भोसले यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात परिवर्तनाचे ‘कमळ’ फुलवले. पण त्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्ष संघटन वाढविण्यासाठी ‘झटपट पटापट’ इनकमिंग केले; पण हेच इनकमिंग नगरपालिका निवडणुकीत नेत्यांच्या ‘अंगलट’ आल्याची चर्चा आता भाजप वर्तुळात सुरू झालेल्या आहेत.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. म्हणून तर दिवंगत यशवंतराव मोहिते व विलासराव पाटील-उंडाळकर यांनी या मतदारसंघाचे प्रदीर्घ प्रतिनिधीत्व केले. त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील या मतदारसंघाचे नेतृत्व केले. गत विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार अतुल भोसले यांनी येथे परिवर्तनाचे ‘कमळ’ फुलवत काँग्रेसला धक्का दिला.
विधानसभेची निवडणूक जिंकली पण आपल्या मतदारसंघात आपण अधिक भक्कम असले पाहिजे म्हणून आमदार भोसले यांनी इतर पक्ष, संघटनेतील कार्यकर्त्यांना पक्षात मोठ्या प्रमाणात प्रवेश दिला. पण हे नवे चेहरे घेताना जुने नाराज होणार नाहीत याची काळजी तितकीशी घेतली गेली नसल्याची चर्चा आता कराड-मलकापूर नगरपालिका निकालानंतर त्यांच्याच कार्यकर्त्यांत सुरू झाली आहे.
खरंतर भाजपने मोठ्या प्रमाणात इनकमिंग केल्यानंतर आपल्यावर अन्याय होत असल्याच्या भावना कार्यकर्त्यांतून दबक्या आवाजात सुरू झाल्या होत्या. काहींनी आपल्या कामाची गती कमी केली. नव्या आलेल्या कार्यकर्त्यांमुळे पालिकेत उमेदवारी डावलली गेलेल्या काहींनी शांत राहणे पसंत केले. तर काहींनी विरोधी उमेदवारांना रसद पुरवली. या साऱ्याचा परिणाम या दोन्ही नगरपालिका निवडणुकीत पाहायला मिळाला असे बोलले जात आहे.
ते स्वप्न सत्यात उतरले नाही..
विधानसभेला कराड शहरातील विविध आघाड्यांनी डॉ. अतुल भोसले यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत केली होती; मात्र नगरपालिका निवडणुकीत त्या सर्वांना एकसंघ ठेवण्यात आमदार भोसले यांना यश आल्याचे दिसले नाही. त्यातच जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर या दोन्ही निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे मदत करणाऱ्या अनेकांना ते रुचले नाही. परिणामी नगरपालिकेच्या निवडणुका हे स्थानिक राजकारण धरून अनेक आघाड्या भाजप विरोधात एकवटल्या परिणामी कराड नगरपालिकेची सत्ता ताब्यात घेण्याचे आमदार भोसले यांचे स्वप्न सत्यात उतरले नाही.
आत्मचिंतन करायला लागणार
मलकापूर नगरपालिका निवडणूक पार्श्वभूमीवर तर भोसले यांनी मोठ्या प्रमाणात इनकमिंग केले. ‘भाऊ’ नावाच्या दोन तलवारी सुध्दा एकाच म्यानात दाबून बसवण्याचाही प्रयत्न केला; पण तो प्रयत्न फक्त प्रचार शुभारंभ सभेपुरता व्यासपीठावरच दिसला. म्हणून तर बिनविरोध नगरसेवकांचा ‘षटकार’ मारूनही, पालिकेत सत्ता मिळवूनही अल्पावधीतच आकाराला आलेल्या विरोधी आघाडीला सर्व ठिकाणी उमेदवार उभे करता आले नसले तरी त्यांनी मारलेला विजयाचा ‘चौकार’ अन् नगराध्यक्षपदाच्या विरोधी उमेदवाराला पडलेली मते ही नक्कीच भाजपला आत्मचिंतन करायला लावणार आहे.
यांना चाखावी लागली पराभवाची चव!
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील भाजपमध्ये इनकमिंग केलेल्या अनेक मातब्बरांना या निवडणुकीत पराभवाची चव चाखावी लागली. त्यात कराडमधील माजी नगरसेविका स्मिता हुलवान, अंजली कुंभार तसेच माजी नगरसेवक इंद्रजीत गुजर, अरुण जाधव यांच्या परिवारातील सदस्यांना फटका बसला. तर मलकापुरातील माजी नगरसेवक राजेंद्र यादव, प्रशांत चांदे यांनाही विजय मिळविता आला नाही.
त्याचे परिणाम जिल्हा परिषदेला समोर येतील
ग्रामीण भागात देखील विधानसभा निवडणुकीपूर्वी व निवडणुकीनंतर भाजपमध्ये बरेच इनकमिंग झाले आहे. त्याचे परिणाम नक्की काय असणार ? हे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत समोर येतील अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत.