Satara: अत्याचार करणाऱ्या युवकास वीस वर्षांचा कठोर कारावास, कऱ्हाड न्यायालयाचा निकाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 14:44 IST2024-12-25T14:43:36+5:302024-12-25T14:44:15+5:30

अश्लील फोटो ‘व्हायरल’ करण्याची दिली होती धमकी

The accused youth has been sentenced to 20 years rigorous imprisonment for abusing a minor girl by threatening to spread obscene photos in karad | Satara: अत्याचार करणाऱ्या युवकास वीस वर्षांचा कठोर कारावास, कऱ्हाड न्यायालयाचा निकाल 

Satara: अत्याचार करणाऱ्या युवकास वीस वर्षांचा कठोर कारावास, कऱ्हाड न्यायालयाचा निकाल 

कऱ्हाड : अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी युवकाला दोषी धरून न्यायालयाने २० वर्षे कठोर कारावास आणि २ लाख ६० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. कऱ्हाड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या. के. एस. होरे यांनी मंगळवारी ही शिक्षा ठोठावली.

संगम संभाजी डुबल (वय २८, रा. राजमाची-सदाशिवगड, ता. कऱ्हाड) असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. सरकार पक्षाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलीची सोशल मीडियावर संगम डुबल याच्याशी जानेवारी २०२२ मध्ये ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यामध्ये मैत्री झाली. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही संगम डुबल तिला भेटायला जात होता. तसेच दुचाकीवरून तो तिला विजयनगर येथील एका लॉजवर घेऊन गेला. 

“तू मला आवडतेस, माझे तुझ्यावर प्रेम आहे,” असे म्हणून त्याने तिच्याशी लगट केली. मुलीने नकार दिला असता त्याने स्वत:जवळील अश्लील फोटो सोशल मीडियावर ‘व्हायरल’ करण्याची धमकी देत मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर वारंवार ब्लॅकमेल करून शिवीगाळ करीत पीडित मुलीवर त्याने अत्याचार केला. अखेर नैराश्यात गेलेल्या मुलीने याबाबतची माहिती कुटुंबीयांना दिली. त्यानंतर कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात आरोपी संगम डुबल याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक एस. आर. पवार आणि हवालदार व्ही. ए. संदे यांनी या गुन्ह्याचा तपास करून आरोपीविरोधात न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर केले. या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील आर. सी. शहा यांनी काम पाहिले. सरकार पक्षाचा युक्तिवाद, साक्षीदारांची साक्ष आणि सादर करण्यात आलेले पुरावे ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपीला २० वर्षे कठोर कारावास आणि २ लाख ६० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षाला पोलिस कॉन्स्टेबल एस. बी. भोसले यांनी सहकार्य केले.

सरकार पक्षाने नऊ साक्षीदार तपासले..

सरकार पक्षाकडून या खटल्यात नऊ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक एस. आर. पवार, हवालदार व्ही. ए. संदे यांच्यासह पीडित मुलगी, वैद्यकीय अधिकारी आणि लॉज व्यवस्थापक यांच्या साक्ष महत्त्वपूर्ण ठरल्या. सरकार पक्षाचा युक्तिवाद, साक्ष आणि पुरावे ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपीला गुन्ह्यात दोषी धरले.

Web Title: The accused youth has been sentenced to 20 years rigorous imprisonment for abusing a minor girl by threatening to spread obscene photos in karad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.