'ती' रात्र, रूम नंबर ११४ अन् १७ तासांचे रहस्य! महिला डॉक्टर आत्महत्या, हॉटेल रूममधील वस्तुस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 09:50 IST2025-10-30T09:50:34+5:302025-10-30T09:50:46+5:30
त्या रात्रीचा घटनाक्रम हॉटेलचे संचालक रणजीत भोसले यांनी माध्यमांपुढे बुधवारी कथन केला.

'ती' रात्र, रूम नंबर ११४ अन् १७ तासांचे रहस्य! महिला डॉक्टर आत्महत्या, हॉटेल रूममधील वस्तुस्थिती
फलटण : फलटणमध्ये महिला डॉक्टरने ज्या हॉटेलमध्ये आत्महत्या केली 'त्या' रात्रीचा घटनाक्रम हॉटेलचे संचालक रणजीत भोसले यांनी माध्यमांपुढे बुधवारी कथन केला.
बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या...
२३ तारखेची मध्यरात्र. १ वाजून २३ मिनिटांनी एका दुचाकीवरून एकटी महिला डॉक्टर हॉटेलच्या गेटवर आली. 'मी बारामतीला चालली आहे; पण रस्ता लांब आहे. मी एकटीच आहे, मला फक्त एक रात्र राहू द्या.' या तिच्या विनंतीनंतर सुरक्षारक्षकाने हॉटेलचे गेट उघडले. केवळ तीन मिनिटांत ती स्वागत कक्षात पोहोचली. तिने स्वतःच रजिस्टरमध्ये नाव नोंदवले, आधार कार्ड दिले आणि 'पेमेंट सकाळी करते' असे सांगून रात्री १ वाजून ३० मिनिटांनी रूम नंबर ११४ मध्ये गेली.
सतरा तासांची 'ती' गूढ शांतता...
सकाळचे ११ वाजले तरी रूम नंबर ११४चे दार उघडले नव्हते. त्यामुळे मॅनेजरने औपचारिकता म्हणून दार वाजवले; परंतु प्रतिसाद आला नाही. सायंकाळी चार वाजता पुन्हा दार वाजवले; त्यावेळी देखील प्रतिसाद मिळाला नाही. हॉटेलचे संचालक रणजीत भोसले यांना बोलावून सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी डुप्लिकेट चावीने दार उघडले. व्हिडीओ रेकॉर्डिंग सुरू ठेवले. आतमध्ये महिला डॉक्टर पंख्याला लटकलेली दिसली.
ही आत्महत्याच, बदनाम करण्यासाठी षडयंत्र
फलटण : उद्धवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत माझा व माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर एकत्रित फोटो दाखवला. हा फोटो भाजप प्रवेशाच्या कार्यक्रमातील आहे.
रणजितसिंह यांना बदनाम करण्यासाठी विरोधकांनी षडयंत्र रचले आहे. हत्या हा राजकीय शब्द असून, आत्महत्या ही वस्तुस्थिती आहे, असे हॉटेलचे मालक दिलीपसिंह भोसले यांनी परिषदेत केला.
राहुल गांधींचा कुटुंबीयांशी फोनवरून संवाद
वडवणी (जि. बीड) : आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आले होते. यावेळी काँग्रेसचे नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी थेट फोनवरून पीडितेच्या कुटुंबीयांशी चर्चा केली. आरोपींना फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत काँग्रेस पक्ष कुटुंबाच्या सोबत असल्याची ग्वाही त्यांनी दिली.